पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2021 ला प्रयागराजला भेट देणार असून सुमारे 2 लाख महिला सहभागी होणार असलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणारा आहेत.
महिला सबलीकरणासाठी प्रामुख्याने उपेक्षित स्तरावरच्या महिलांना आवश्यक कौशल्ये,प्रोत्साहन आणि संसाधने पुरवत त्याद्वारे महिला सबलीकरणासाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांना सहाय्य करणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान, स्वयंसहाय्यता गटांच्या बँक खात्यात 1,000 कोटी रुपये हस्तांतरित करणार असून सुमारे 16 लाख महिलांना याचा लाभ होणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत हे हस्तांतरण करण्यात येणार असून 80,000 स्वयंसहाय्यता गटांना समुदाय गुंतवणूक निधी ( सीआयएफ) म्हणून प्रत्येकी 1.10 लाख रुपये आणि 60,000 स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी म्हणून प्रत्येकी 15,000 रुपये प्राप्त होणार आहेत.
या कार्यक्रमात 20,000 व्यवसाय समन्वयक सखींना (B.C - सखी) पहिल्या महिन्याचा 4,000 रूपयांचा स्टायपेंड पंतप्रधान हस्तांतरित करून त्यांना प्रोत्साहन देणार आहेत. या B.C सखी, तळाच्या स्तरावर दारापर्यंत वित्तीय सेवा पुरवण्याचे काम सुरु करताच त्यांना सहा महिन्यासाठी 4,000 रुपयांचा स्टायपेंड देण्यात येतो. याद्वारे त्यांना कामात स्थैर्य मिळून त्यानंतर त्यांच्या व्यवहाराद्वारे कमिशन मिळवण्याला त्यांची सुरवात होईल.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या 1 लाखाहून अधिक लाभार्थींनाही पंतप्रधान सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणार आहेत. या योजने अंतर्गत मुलींच्या जीवनातल्या विविध टप्यात काही अटींसह रक्कम हस्तांतरित करण्यात येते. प्रती लाभार्थी 15,000 रुपये रक्कम हस्तांतरित करण्यात येते. मुलीच्या जन्माच्या वेळी (2000 रुपये ), एक वर्षाच्या सर्व लसी पूर्ण झाल्यावर रुपये (1000 रुपये), पहिलीत प्रवेश केल्यानंतर (2000रुपये ), सहावीत प्रवेश केल्यानंतर (2000 रुपये ), नववीत प्रवेश केल्यानंतर (3000रुपये ), दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी/पदविका प्रवेशावेळी( 5000 रुपये ) असे याचे स्वरूप आहे .
पंतप्रधान पूरक पोषण संदर्भातल्या 200 हून अधिक उत्पादन युनिट्सची पायाभरणी करणार आहेत.स्वयं सहाय्यता गटांकडून या युनिट्सन निधी दिला जात आहे आणि सुमारे 1 कोटी रुपये प्रती युनिट खर्चून याचे बांधकाम केले जात आहे. ही युनिट एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत राज्याच्या 600 प्रभागाना पूरक पोषण आहार पुरवतील.