पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईला भेट देणार आहेत. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या(एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. आशियातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने या बहुविध विकास बँकेची स्थापना करण्यात आली आहे.
तिसऱ्या वार्षिक बैठकीची संकल्पना “ पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठ्याला चालना: नाविन्य आणि सहकार्य” अशी आहे. विविध देशांचे तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असून पायाभूत क्षेत्रातील गुंतणुकीच्या माध्यमातून शाश्वत भवितव्य निर्माण करण्याबाबतच्या संकल्पनांचे आणि अनुभवांचे आदान-प्रदान यावेळी होईल.
या वर्षी आशियाई पायाभूत सुविधा मंचाची स्थापनाही होणार आहे. यामुळे पायाभूत क्षेत्रातील दिग्गजांना एकत्रित मंच उपलब्ध होईल आणि प्रकल्प आधारित विस्तृत सादरीकरण ते करतील. महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठ्याचे आव्हान पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्यावरही यावेळी भर दिला जाईल.
त्यानंतर आर्थिक विकास, पायाभूत विकास,नाविन्यता आणि रोजगार निर्मिती, धोरणात्मक प्रयत्न अशा विविध मुद्यांवर पंतप्रधान उद्योजकांशी आणि उद्योग क्षेत्रातील महत्वांच्या व्यक्तींशी चर्चा करतील.