पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 27 जानेवारीला तमिळनाडू इथल्या मदुराईचा दौरा करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मदुराईसाठीच्या वैद्यकीय सेवा सुविधांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होईल. मदुराई इथे प्रस्तावित AIIMS म्हणजेच अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच राजाजी मेडिकल कॉलेजमधल्या सुपर स्पेशालिटी कक्षाचे उद्घाटन तंजावर आणि तिरुनेलीवेल्ली वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही सेवांचे आधुनिकीकरण केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान जाहीर सभेत भाषणही करणार आहेत.
AIIMS मदुराई:
केंद्र सरकारने 2015-16 साली या AIIMS ची घोषणा केली होती. त्यासाठी 1264 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. या संस्थेचे बांधकाम 45 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. 750 खाटांच्या या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा असतील. त्याशिवाय पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थाही असेल.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या अद्ययावतीकरणाचे प्रकल्प:
मदुराईच्या राजाजी मेडिकल कॉलेजमध्ये 450 कोटी रुपये खर्च करुन सुपर स्पेशालिटी वॉर्ड बांधण्यात आला आहे. या वॉर्डात 320 खाटा असतील. तंजावर आणि तिरुनेलीवेल्ली इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातही सुपर स्पेशालिटी वॉर्ड निर्माण करण्यात आले असून, यात जवळपास सर्वच वैद्यकीय शाखांच्या अत्याधुनिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचा भाग म्हणून हे प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत, देशभरात 20 AIIMS ची स्थापना केली जाणार आहे. त्यापैकी 6 AIIMS ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 73 वैद्यकीय महाविद्यालयांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.