उद्या दिनांक 6 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये झुनझुनु येथे भेट देणार आहेत.
बालिकांना वाचविण्याच्या आणि त्यांना शिक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून 640 जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते विस्तार केला जाईल. सध्या देशभरातील 161 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जातो.
कार्यक्रमाच्या लाभार्थी माता आणि बालिकांशी पंतप्रधान संवाद साधतील. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यांना प्रमाणपत्रे प्रदान करतील.
पंतप्रधान उद्या झुनझुनु येथे राष्ट्रीय पोषण मोहिमेचेही उद्घाटन करणार आहे. ते एन एनएम– आय सी डी एस कॉमन ॲप्लिकेशन या सॉफ्टवेअरचेही उद्घाटन करतील. बालकांचे कुपोषण दूर करणे, जन्मवेळी कमी वजनाच्या समस्येवर मात करणेतसेच महिला आणि किशोरवयीन मुलींच्या सर्वांगिण विकासाची काळजी घेण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबवली जाणार आहे.