पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर जाणार आहेत. इटानगर येथे ग्रीन फिल्ड विमानतळ, सेला बोगदा आणि ईशान्य गॅस ग्रीडची ते पायाभरणी करतील. डीडी अरुण प्रभा वाहिनी आणि गार्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या तीन राज्यात अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील.
अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान उद्या सकाळी गुवाहाटी येथून इटानगरला पोहचतील. इटानगरमधील आयजी पार्क येथे अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. पंतप्रधान होलोंगी येथे ग्रीन फिल्ड विमानतळाच्या बांधकामाची पायाभरणी करतील. सध्या इटानगरला जवळचा विमानतळ आसाममधील लिलाबारी येथे असून तो 80 कि.मी. दूर आहे. होलोंगी येथील विमानतळामुळे हे अंतर एकचतुर्थांशने कमी होईल. यामुळे या भागाला उत्तम संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच या विमानतळामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. या विमानतळामुळे या भागाच्या आर्थिक विकासालाही प्रोत्साहन मिळेल. आणि तो देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. या विमानतळाच्या रस्त्यालगत ग्रीन बेल्ट, पर्जन्य जल संवर्धन, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आदी वैशिष्ट्ये असतील.
अरुणाचल प्रदेशमध्ये सेला बोगद्याची पायाभरणी पंतप्रधान करतील. यामुळे नागरिक तसेच सुरक्षा दलाला वर्षभर तवांग खोऱ्यांत येणे-जाणे शक्य होईल. या बोगद्यामुळे तवांगला जाण्याचा प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल आणि या भागातील पर्यटन आणि संबंधित आर्थिक घडामोडींना चालना मिळेल.
अरुणाचल प्रदेशसाठी डीडी अरुण प्रभा या समर्पित डीडी वाहिनीचा शुभारंभ इटानगरमधल्या आयजी पार्क येथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ही दूरदर्शनची 24 वी वाहिनी असेल. पंतप्रधान अरुणाचल प्रदेशमध्ये 110 मेगावॅट पारे जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. निप्कोद्वारा निर्मित हा प्रकल्प डिक्रोंग नदीच्या पात्रात वीज निर्मिती करेल आणि ईशान्यकडील राज्यांना स्वस्त दरात जलविद्युत ऊर्जा उपलब्ध करेल. यामुळे या भागातील ऊर्जा उपलब्धता सुधारेल.
अरुणाचल प्रदेशमध्ये जोट येथे भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या कायमस्वरुपी संकुलाची पायाभरणी पंतप्रधान करतील. यामुळे ईशान्येकडील राज्यांच्या चित्रपटप्रेमी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होईल. अरुणाचल प्रदेशमध्ये पुनर्विकासित तेझू विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या विमानतळावर उडान योजनेअंतर्गत व्यावसायिक परिचालनासाठी नवीन टर्मिनल बांधण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये 50 आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान करतील. सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी आयुष्मान भारत योजनेचा आरोग्य आणि कल्याण केंद्र हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सौभाग्य योजनेअंतर्गत, अरुणाचल प्रदेशमध्ये 100 टक्के घरांच्या विद्युतीकरणाची घोषणा पंतप्रधान करतील.
आसाममध्ये पंतप्रधान
इटानगरहून पंतप्रधान गुवाहाटीला परत येतील. येथे ते ईशान्य गॅस ग्रीडची पायाभरणी करतील. यामुळे या संपूर्ण भागात नैसर्गिक वायूचा अखंड पुरवठा सुनिश्चित होईल आणि यामुळे या भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. संपूर्ण ईशान्य भागाला स्वस्त आणि दर्जेदार गॅस पुरवण्याच्या सरकारच्या योजनेचा हे ग्रीड हा एक भाग आहे. पंतप्रधान कामरूप, सचर, हेलाकांडी आणि कलिमगंज जिल्ह्यांमध्ये गॅस वितरण नेटवर्कची पायाभरणी करतील. यामुळे घरं, औद्योगिक आणि व्यावसायिक कारखान्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा सुनिश्चित होईल.
पंतप्रधान तीनसुखिया येथे होलाँग मॉड्यूलर गॅस प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या सुविधेमुळे आसाममध्ये एकूण गॅस उत्पादनाच्या 15 टक्के अधिक वीज निर्माण होईल. पंतप्रधान नुमालीगड येथे एनआरएल बायो रिफायनरी आणि बिहार, प. बंगाल, सिक्कीम आणि आसाममधून जाणाऱ्या बरौनी-गुवाहाटी या 729 कि.मी. गॅस पाईपलाईनची पायाभरणी करतील.
त्रिपुरामध्ये पंतप्रधान
दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान आगरतलाला भेट देतील. गार्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे लोकार्पण पंतप्रधान करतील. यामुळे त्रिपुराला दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रवेशद्वार बनवले जाईल. पंतप्रधान नरसिंगगड येथे त्रिपुरा तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन परिसराचे उद्घाटन करतील.