पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 9 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातल्या आग्रा येथे भेट देणार आहेत. गंगाजल प्रकल्प आणि इतर विविध विकास प्रकल्पांचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. आग्रा स्मार्ट सिटीसाठी एकिकृत नियंत्रण केंद्र, एस. एन. वैद्यकीय महाविद्यालय सुधारणा यासाठी भूमीपूजनही पंतप्रधान करणार आहेत.
गंगाजल प्रकल्पासाठी 2880 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे आग्रा शहराला अधिक सुनिश्चित पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांना आणि पर्यटकांनाही याचा लाभ होणार आहे.
एस.एन.वैद्यकीय महाविद्यालय सुधारणा प्रकल्प 200 कोटी रुपये खर्चाचा आहे. महिला रुग्णालयात 100 खाटांचा प्रसुती कक्ष उभारण्याचाही यात समावेश आहे. यामुळे समाजातल्या वंचित वर्गाला उत्तम आरोग्य आणि प्रसुतीसंदर्भातली देखभाल उपलब्ध होणार आहे. एकिकृत नियंत्रण केंद्र उभारण्याच्या प्रकल्पाला 285 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यामुळे जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी म्हणून आग्य्राचा विकास व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी मदत होईल.
आग्रा येथील कोठी मीना बाजार येथे एका जनसभेला पंतप्रधान संबोधित करतील.
पंतप्रधानांची या शहराला ही दुसरी भेट आहे. 20 नोव्हेंबर 2016च्या भेटीत त्यांनी पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण)चे उद्घाटन केले होते. या योजनेअंतर्गत 65 लाख घरे बांधण्यात आली आहेत, यात उत्तर प्रदेशातल्या 9.2 लाख घरांचा समावेश आहे. या भागात रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवांचेही त्यांनी उद्घाटन केले होते.