पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडाला उद्या भेट देणार आहेत. ग्रेटर नोएडा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थेत ते विविध विकास कामांचा प्रारंभ करतील.
फलकांचे अनावरण करून पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थेचे पंतप्रधान उद्घाटन करतील. या परिसरातल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्यांचे ते अनावरण करतील.
मेट्रोच्या नोएडा सिटी सेंटर-नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी विभागाचे ते उद्घाटन करतील. नोएडाच्या रहिवाशांना यामुळे सोयीचे आणि जलद वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यावरण स्नेही वाहतूक साधन उपलब्ध होणार असून रस्त्यावरची वाहतूक कोंडीही कमी व्हायला मदत होणार आहे. 6.6 किलोमीटर लांबीचा हा मार्ग म्हणजे दिल्ली मेट्रो ब्लू लाईनचा विस्तार आहे. दोन औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. बुलंदशहर जिल्ह्यातला 1320 मेगावॅटच्या खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्प यापैकी एक आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 660 मेगावॅटचे दोन सयंत्र राहतील. पर्यावरण रक्षणासाठी उत्सर्जन नियंत्रणासाठीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. यामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी इंधनाचा वापरही कमी होणार आहे.
या प्रकल्पामुळे उत्तर भारतातल्या वीजेच्या टंचाईच्या परिस्थितीत बदल होणार असून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांना याचा लाभ होणार आहे. बुलंदशहर जिल्हा आणि पश्चिम उत्तर प्रदेश नजीकच्या जिल्ह्यातल्या सर्वंकष विकासाला यामुळे चालना मिळणार असून लक्षणीय प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
बिहारमधल्या बक्सर येथे 1320 मेगावॅटचा दुसरा प्रकल्प आहे. व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान याचे उद्घाटन करतील. यामध्ये प्रत्येकी 660 मेगावॅटची दोन सयंत्रं असतील. पर्यावरण रक्षणासाठी उत्सर्जन नियंत्रणासाठीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बिहार आणि पूर्व भागातील वीज टंचाईची स्थिती बदलणार आहे. यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील.