देहरादूनमध्ये 21 जून 2018 रोजी होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
हिमालयाच्या कुशीत दडलेल्या देहरादूनमधील वन संशोधन संस्थेच्या हिरवळीवर हजारो स्वयंसेवकांसह पंतप्रधान योगासने करणार आहेत.
यानिमित्त जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी 2015 मध्ये नवी दिल्लीतील राजपथावर, 2016 मध्ये चंदीगडमधील कॅपिटॉल कॉम्लेक्स येथे, तर 2017 मध्ये लखनऊमधील रमाबाई आंबेडकर सभास्थळ येथे पंतप्रधान योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यानिमित्त जगभरातील योगप्रेमींना शुभेच्छा देतांना पंतप्रधान म्हणाले की, योग ही प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी मानव जातीला दिलेली ही अमुल्य भेट आहे.
योगाभ्यास हा केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम नाही, तर आरोग्याची हमी देणारे पारपत्र आहे, तंदुरुस्ती आणि मन:शांतीची गुरुकिल्ली आहे. तुम्ही सकाळी जे व्यायाम करता, तेवढ्या पुरता योगा मर्यादित नाही. तुमची दैनंदिन कामे मेहनतीने आणि संपूर्ण सजगतेने करणे हा देखिल योगाभ्यासाचा एक प्रकार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आजच्या अतिरेकाच्या जगात योगाभ्यासामुळे संयम आणि संतुलन शक्य होते. मानसिक दबाव असलेल्या या जगात योगामुळे शांती मिळते. दुर्लक्षित जगात योगाभ्यासामुळे लक्ष केंद्रीत करायला मदत मिळते. भयमुक्त जगात योगाभ्यासामुळे आशा, सामर्थ्य आणि धैर्य प्राप्त होते, असे पंतप्रधान म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर विविध योगासनांची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच जगभरात विविध ठिकाणी योगासने करणाऱ्या लोकांची छायाचित्रेही पंतप्रधानांनी सोशल मिडियावर दिली आहेत.