पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सप्टेंबरला आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर उद्घाटन करतील.
केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशकतेचे उद्दीष्ट जलदगतीने साध्य व्हावे यासाठी जनसामान्यांकरिता सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह बँक म्हणून या बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. तीन लाखाहून जास्त पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांसह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या टपाल खात्याच्या विशाल जाळ्याचा या बँकांना उपयोग होणार आहे. त्याचबरोबर देशात बँकिंग क्षेत्राची व्याप्तीही वाढणार आहे.
केंद्र सरकारच्या या आणखी यशस्वी उपक्रमामुळे, आयपीपीबीमुळे देशाच्या जलदगतीने होणाऱ्या विकासाचे लाभ देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचणार आहेत.
उद्घाटनाच्या दिवशी आयपीपीबीच्या 650 शाखा आणि 3250 ॲक्सेस पॉईंट असतील.
31 डिसेंबर 2018 पर्यंत देशातील सर्व 1.55 लाख टपाल कार्यालये आयपीपीबीशी जोडली जाणार आहेत.
बचत खाते, चालू खाते, मनी ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर, बिल आणि युटीलिटी पेमेंट, एंटरप्राइज आणि मर्चंन्ट पेमेंट या सुविधा आयपीपीबीकडे उपलब्ध राहणार आहेत. या आणि इतर सेवा काऊंटर सेवा, मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग ॲप, एसएमएस आणि आयव्हीआर अशा विविध माध्यमातून बँकांचे तंत्रज्ञान मंच वापरुन प्रदान केल्या जातील.