पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची 7 वी आवृत्ती 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू होईल. सॉफ्टवेअर आवृत्ती विनाखंड 36 तास चालेल, तर हार्डवेअर आवृत्ती 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान सुरू राहील. मागील आवृत्त्यांप्रमाणेच, या आवृत्तीतही सहभागी विद्यार्थी संघ मंत्रालये किंवा विभागांनी अथवा उद्योगानी दिलेल्या समस्या विधानांवर काम करतील किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रांशी जोडलेल्या 17 संकल्पनांपैकी कोणत्याही एका संकल्पनेवर आधारित विद्यार्थी नवोन्मेष श्रेणीमध्ये त्यांच्या कल्पना सादर करतील.
ही क्षेत्रे आहेत - आरोग्यसेवा, पुरवठा साखळी आणि वाहतूक , स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वतता, शिक्षण आणि कौशल्य विकास, पाणी, कृषी आणि अन्न, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन, यांचा समावेश आहे.
या वर्षीच्या आवृत्तीमध्ये काही आकर्षक विषय निवडले आहेत. यामध्ये 'एन्हान्सिंग इमेजेस ऑफ डार्कर रिजन्स ऑन द मून’ या विषयावर इस्त्रोने सादरीकरण केले. एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा, उपग्रहाकडून मिळणारी माहिती आणि डायनॅमिक मॉडेल्सचा वापर करून ‘डेव्हलपिंग ए रिअल-टाइम गंगा वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग’ ची कार्यप्रणाली विकसित करण्याचा प्रयोग जलशक्ती मंत्रालयाने केला आहे. तर आयुष मंत्रालयाने 'डेव्हलपिंग स्मार्ट योग मॅट इंटिग्रेटेड विथ एआय’ चे सादरीकरण केले आहे; .
यावर्षी, 54 मंत्रालये, विविध विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी 250 हून अधिक समस्यांबाबत सादरीकरण केले आहे. संस्था स्तरावर अंतर्गत हॅकाथॉनमध्ये 150% वाढ नोंदवली गेली आहे, 2023 मध्ये ही संख्या 900 होती तर, यंदा - 2024 मध्ये ही संख्या सुमारे 2,247 पर्यंत वाढली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती आहे. संस्था स्तरावर स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 मध्ये 86,000 हून अधिक संघ सहभागी झाले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी विविध संस्थांनी सुमारे 49,000 विद्यार्थी संघांची (प्रत्येक संघामध्ये 6 विद्यार्थी आणि 2 मार्गदर्शक) शिफारस केली आहे.