पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. ‘मैत्री सेतु’ हा पूल फेनी नदीवर बांधला आहे, जी भारतीय सीमेवर त्रिपुरा राज्य आणि बांगलादेशात वाहते. ‘मैत्री सेतु’ हे नाव भारत आणि बांगलादेशमधील वाढते द्विपक्षीय संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे. 133 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितने हा प्रकल्प बांधला आहे. 1.9 किमी लांबीचा हा सेतू भारतातील सबरूम आणि बांगलादेशातील रामगढ यांना जोडतो. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या व्यापार आणि लोकांना लोकांशी जोडणाऱ्या चळवळीसाठी हा एक नवीन अध्याय ठरणार आहे. या उद्घाटनामुळे , बांगलादेशच्या चटगांव बंदरात प्रवेश करण्यासाठी त्रिपुरा हे ‘ईशान्येकडील प्रवेशद्वार ' ’ बनणार आहे, जे सबरूमपासून अवघ्या 80 कि.मी. अंतरावर आहे.
सबरूम येथे उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक तपासणी चौकीची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यामुळे उभय देशांदरम्यानची मालवाहतूक आणि प्रवाशांची ये जा सुलभ करायला मदत होणार आहे . यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये उत्पादनांसाठी बाजारपेठेच्या नवीन संधी उपलब्ध होतील तसेच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील प्रवाशांना ये जा करण्याच्या दृष्टीने सुलभ वाहतुकीसाठी मदत होईल. अंदाजे 232 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प भारतीय भूमी बंदरे प्राधिकरणाने हाती घेतला आहे.
कैलाशाहर येथील उनाकोटी जिल्हा मुख्यालयाला खोवई जिल्हा मुख्यालयाशी जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग 208 ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग 44 ला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. 80 किमी .लांबीचा 1078 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितने हाती घेतला आहे.
63.75 कोटी रुपये खर्चातून राज्य सरकारने विकसित केलेले राज्य महामार्ग आणि आणि इतर जिल्हा रस्त्यांचे उद्दघाटनही पंतप्रधान करणार आहेत. हे मार्ग त्रिपुरातील नागरिकांना सर्व संपर्कसुविधा उपलब्ध करतील.
पंतप्रधान आवास योजना (शहरी ) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 40,978 घरांचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 813 कोटी रुपयांच्या खर्चातून ही घरे बांधण्यात आली आहेत. आगरताळा स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत, बांधण्यात आलेल्या एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्राचे उदघाटनही पंतप्रधान करणार आहेत.
पंतप्रधान पुढे, ओल्ड मोटर स्टँड इथे बांधण्यात येणाऱ्या बहुस्तरीय वाहन पार्किंग आणि व्यावसायिक संकुलाची पायाभरणी करतील.सुमारे 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे विकसित करण्यात येणार आहे.
लिचूबागण ते विमानतळ पर्यंतच्या चौपदरीकरणाच्या दृष्टीने विद्यमान रस्ता रुंदीकरणाची ते पायाभरणी करतील. आगरताळा स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत सुमारे 96 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येईल.