पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 नोव्हेंबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 4 वाजता औषध निर्मिती क्षेत्राच्या पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
हा एक विशिष्ट उपक्रम असून सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि संशोधक यांच्यातील प्रमुख भारतीय आणि आंतरराष्ट्रीय हित धारकांना एकत्र आणणे आणि भारतातील औषध निर्मिती उद्योगात एक समृद्ध नवोन्मेष परिसंस्था वृद्धिंगत करण्यासाठी प्राधान्यक्रमांवर चर्चा करणे आणि धोरण आखणे हा या परिषदेचा उद्देश आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात वाढीची क्षमता असलेल्या भारतीय फार्मा उद्योगातील संधी देखील अधोरेखित करेल .
दोन दिवसीय शिखर परिषदेत 12 सत्रे असतील आणि 40 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्ते हे नियामक वातावरण, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अर्थसहाय्य , उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधां अशा विविध विषयांवर चर्चा करतील.
यामध्ये देशांतर्गत आणि जागतिक औषध निर्मिती उद्योगातील प्रमुख सदस्य, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट, आयआयएम अहमदाबाद आणि इतर नामांकित संस्थांमधील अधिकारी, गुंतवणूकदार आणि संशोधकांचा सहभाग असेल.
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया हे देखील उपस्थित राहणार आहेत.