पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबरला दिल्ली मेट्रो च्या नवीन मॅजेन्टा मार्गाचे उदघाटन करण्यात येईल. हा मार्ग नोएडाच्या बोटॅनिकल गार्डन आणि कालकाजी मंदिराला संलग्न असेल, जो नोएडा आणि दक्षिण दिल्ली दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करेल. या प्रसंगी पंतप्रधान नोएडातील एका जाहीर सभेला संबोधित करतील.
केंद्र सरकारच्या शहरी वाहतुकीच्या आधुनिकीकरणा साठीच्या प्रयत्नांना हि प्रणाली म्हणजे एक दुवा असून ती केंद्रित तंत्रज्ञान, पर्यावरण – अनुकूल द्रुतगती जलद शहरी वाहतूक प्रणालीचे प्रतिनिधित्व करते.
वर्ष 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटीत होणारी ही तिसरी मेट्रो आहे. त्यांनी जूनमध्ये कोच्चि मेट्रो तर नोव्हेंबरमध्ये हैदराबाद मेट्रो राष्ट्राला अर्पण केली असून, या दोन्ही प्रसंगी पंतप्रधानांनी सार्वजनिक सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नवीन रेल्वेद्वारे मार्गक्रमण केले होते.
राष्ट्रीय राजधानी विभागातील कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मेट्रो ने प्रवास करतात. जानेवारी 2016 मध्ये, इंटरनॅशनल सोलर अलायन्स मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान आणि तत्कालीन फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोइस हॉलंदे यांनी दिल्लीहून गुडगाव पर्यंतचा प्रवास मेट्रोने केला आहे. अलीकडेच एप्रिल 2017 मध्ये, पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी अक्षरधाम मंदिरला सुद्धा मेट्रो द्वारेच भेट दिली होती.
मास रॅपिड ट्रांजिट सिस्टीमद्वारे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मागील साडे तीन वर्षांपासून सुमारे 165 किलो मीटर वर नऊ मेट्रो प्रकल्प सुरू केले आहेत. 140 किलो मीटर पेक्षा जास्त लांबीच्या पाच नवीन मेट्रो रेल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या मेट्रो लाईनची सुरूवात प्रस्तावित केली आहे.