पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता गुजरात मधील अडालज येथील श्री अन्नपूर्णाधाम ट्रस्टचे वसतीगृह व शैक्षणिक संकुलाचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन करतील. याच कार्यक्रमात पंतप्रधान जनसेवक ट्रस्टच्या हिरामणी आरोग्यधामचे भूमीपूजन करतील.
वसतीगृह व शैक्षणिक संकुलात 600 विद्यार्थ्यांसाठी 150 निवासी खोल्या व बोर्डिंग सुविधा आहे. येथे उपलब्ध होणाऱ्या इतर सुविधांमध्ये गुजरात लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे, ई-ग्रंथालय, परिसंवादगृह, क्रीडा सुविधा, टीव्ही पाहण्यासाठी कक्ष आणि विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा आदी सुविधांचा समावेश आहे.
हिरामणी आरोग्य धाम हे जनसेवक ट्रस्टमार्फत विकसित केले जाणार आहे. येथे आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच एकावेळेस 14 जणांचे डायलिसिस करण्याची सुविधा, 24 तास सेवा देणारी रक्तपेढी, चोवीस तास उघडे असणारे औषधांचे दुकान, आधुनिक रक्त तपासणी प्रयोगशाळा, आरोग्य तपासणीसाठी उच्च दर्जाची साधने आदी सोयी असतील. आयुर्वेद, होमिओपाथी, अक्युपंक्चर, योग थेरपी आदींसाठी आधुनिक सुविधायुक्त डे-केअर केंद्र असेल. येथे प्राथमिक उपचार प्रशिक्षण केंद्र, तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुविधा देखील असतील.