पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशच्या शहरी विकास विभागातर्फे वाराणसी येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन करणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत. परिषदेत देशभरातील विविध राज्यातील महापौर सहभागी होणार आहेत. "नवीन शहरी भारत" ही परिषदेची संकल्पना आहे.
शहरी भागात राहणे सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधानांचे निरंतर प्रयत्न सुरु असतात. जुन्या आणि मोडकळीला आलेल्या नागरी पायाभूत व्यवस्था आणि सुविधांचा अभाव या समस्या सोडवण्यासाठी सरकारने अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. या प्रयत्नांअंतर्गत उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशेषत: गेल्या पाच वर्षांत तिथे शहरी सुविधांमध्ये मोठी प्रगती आणि परिवर्तन झालेले दिसून येते.
17 ते 19 डिसेंबर या कालावधीत शहरी विकास क्षेत्रात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारची महत्वपूर्ण कामगिरी सर्वांसमोर मांडण्यासाठी एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.