जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवन येथे येत्या 5 जून रोजी सकाळी 11 वा. होणाऱ्या माती वाचवा चळवळीवरील (सेव्ह सॉईल) कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायास पंतप्रधान संबोधितही करणार आहेत.
मातीच्या ढासळणाऱ्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्या मध्ये सुधारणा करण्यास जाणीवपूर्वक प्रतिसाद तयार करण्यासाठी सेव्ह सॉईल ही जागतिक चळवळ आहे. मार्च 2022 मध्ये सद्गुरू यांनी ही चळवळ सुरू केली आणि त्यांनी यासाठी 27 देशांमधून 100 दिवस मोटरसायकलवरून प्रवास केला. 5 जून हा दिवस 100 दिवसांच्या प्रवासाचा 75 वा दिवस आहे. भारतात मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी सामायिक चिंता आणि कटिबद्धता याचे प्रतिबिंब पंतप्रधानांच्या या कार्यक्रमातील सहभागात उमटले आहे.