जागतिक जैवइंधन दिवसानिमित्त उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, खासदार, अधिकारी यांना ते संबोधित करतील.
कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात जैवइंधने साहाय्यकारी ठरु शकतात. स्वच्छ पर्यावरण, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती यामध्ये जैवइंधने मोलाचे योगदान देऊ शकतात. म्हणूनच स्वच्छ भारत आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसंदर्भातील उपक्रमासह विविध सरकारी उपक्रमांमध्ये जैवइंधनाला स्थान देण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या समावेशाचे प्रमाण वाढले आहे. 2013-14 इथेनॉल पुरवठा वर्षात ते 38 कोटी लीटर होते. 2017-18 इथेनॉल पुरवठा वर्षात ते अंदाजे 141 कोटी लीटरवर पोहोचले आहे. सरकारने जून 2018 मधील राष्ट्रीय जैवइंधने धोरणालाही मान्यता दिली आहे.