पंतप्रधान नरेंद्र मोदी, 25 डिसेंबर 2021 ला दुपारी 12:30 च्या सुमाराला गुजरातमध्ये कच्छ मधल्या गुरुद्वारा लखपत साहिब इथे गुरु नानक देव जी यांच्या गुरुपुरब सोहळ्याला, दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.
दर वर्षी 23 ते 25 डिसेंबर या काळात गुजरातमधला शीख संगत गुरुद्वारा लखपत साहिब इथे गुरु नानक देव जी यांचा गुरुपुरब सोहळा साजरा करते. गुरु नानक देव जी यांनी आपल्या प्रवासादरम्यान लखपत इथे वास्तव्य केले होते. गुरुद्वारा लखपत साहिब इथे त्यांच्या लाकडी खडावा आणि पालखी, तसेच गुरुमुखी आणि हस्तलिखितेही आहेत.
2001 च्या भूकंपात या गुरुद्वाराचे नुकसान झाले होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांनी याची दुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. यातून शीख पंथाप्रती पंतप्रधानांच्या अपार आदर भावनेचे दर्शन घडते. गुरु नानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व, गुरु गोविंद सिंह जी यांचे 350 वे प्रकाश पर्व, गुरु तेग बहाद्दूर जी यांचे 400 वे प्रकाश पर्व यासह नुकत्याच झालेल्या अनेक कार्यक्रमातून याची प्रचीती आली आहे.