पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनात 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता “डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटिड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अपटू रुपीस 5 लाख” (ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी) या कार्यक्रमाला संबोधित करतील.
ठेव विम्यामध्ये भारतातील सर्व व्यावसायिक बँकांमधील बचत, मुदत, चालू, आवर्ती ठेवी इत्यादी सर्व ठेवींचा समावेश होतो. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत राज्य, केंद्रीय आणि प्राथमिक सहकारी बँकांमधील ठेवी, यांचाही समावेश आहे. सरकारने सुधारणेचे मोठे पाऊल उचलत बँक ठेव विमा संरक्षण 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवले.
प्रति बँक प्रति ठेवीदार 5 लाख रुपये ठेव विमा संरक्षणासह गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय संदर्भचिन्ह 80% च्या तुलनेत संपूर्ण संरक्षित खात्यांची संख्या एकूण खात्यांच्या 98.1% आहे.
रिझर्व बँकेच्या निर्बंधाखाली असलेल्या 16 नागरी सहकारी बँकांच्या ठेवीदारांकडून प्राप्त दाव्यांनुसार डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ) अंतरिम रकमेचा पहिला हप्ता नुकताच जारी केला आहे. 1 लाखांहून अधिक ठेवीदारांच्या दाव्यांनुसार पर्यायी बँक खात्यांमध्ये 1300 कोटींहून अधिक रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री, अर्थ राज्यमंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नरही उपस्थित राहणार आहेत.