आकांक्षा बाळगून असणाऱ्या जिल्हयांच्या परिवर्तनविषयक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहे. निती आयोगातर्फे आयोजित ही परिषद नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणार आहे. 100 पेक्षा जास्त जिल्हयाचे परिवर्तन करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधान या परिषदेत संवाद साधतील.
2022 पर्यंत नवभारताची निर्मिती, या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विकास विषयक विशिष्ट मानकांची पूर्तता न करणाऱ्या जिल्हयांमध्ये जलदगतीने परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण धोरणात्मक उपक्रम हाती घेतला आहे. अशा जिल्हयांमध्ये विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमध्ये समन्वय राखण्याच्या हेतूने अतिरिक्त सचिव आणि सहसचिव दर्जाच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे.