पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान चीन दौऱ्यावर जाणार असून, शियामेन इथल्या 9व्या ब्रिक्स शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान पंतप्रधान म्यानमारलाही भेट देणार आहेत.
9व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी येत्या 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान मी चीनमधल्या शियामेनला भेट देणार आहे, असं पंतप्रधानांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमधे गोव्यात झालेल्या शिखर परिषदेच्या यजमान पदाचा मान भारताला मिळाला होता. गोवा शिखर परिषदेच्या फलीताबाबत पुढे कार्यवाही होईल, त्याचबरोबर चीनच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स भागीदारी अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी ठोस आणि सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
ब्रिक्स सदस्य पाचही देशांच्या उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिक्स व्यापार परिषदेबरोबरही आपण चर्चा करणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
याशिवाय क्षी जिनपिंग यांनी 5 सप्टेंबरला आयोजित केलेल्या उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील राष्ट्रांच्या संवाद कार्यक्रमांतर्गत ब्रिक्स भागीदारांसह नऊ देशातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शिखर परिषदेच्या पार्श्वाभूमीवर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची संधीही आपल्याला लाभणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
शांतता आणि प्रगतीसाठीच्या ब्रिक्स राष्ट्रांच्या भागीदारीचे दुसरे दशक सुरु झाले असून, ब्रिक्सची भूमिका खूपच महत्वाची असल्याचे भारत मानतो. जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यात आणि जागतिक शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी ब्रिक्सला महत्वाचे योगदान द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान आपण म्यानमारला भेट देणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री आँग संनस्यू की यांची आपण भेट घेणार आहोत. या दोन्ही नेत्यांनी 2016 मधे भारताला थेट दिली होती, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधाच्या विकासाचा आढावा घेतला जाईल आणि सहकार्यासाठीच्या नव्या क्षेत्रांचा शोध घेतला जाईल.
सुरक्षा, दहशतवादाला आळा, व्यापार आणि गुंतवणूक, कौशल्य विकास, पायाभूत सोयी सुविधा, ऊर्जा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उभय देशांदरम्यान असलेले सहकार्य अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
बागान या वारसा लाभलेल्या शहरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. इथे आनंद मंदिराच्या नूतनीकरणासाठी भारतीय पुरातत्व खात्याने इथे काम केले असून, गेल्यावर्षीच्या भूकंपात नुकसान झालेल्या अनेक पॅगोडा आणि म्यूरलच्या पुनर्स्थापनेचे कामही भारतीय पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.
म्यानमारमधल्या भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीही आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपल्या भेटीने भारत-म्यानमार यांच्यातल्या संबंधांचा नवा झळाळता अध्याय सुरु होईल आणि ही भेट दोन्ही देशातली सरकारे, व्यापारी समुदाय आणि जनतेतले सहकार्य अधिक दृढ होण्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.