आपणा सर्वांशी संवाद साधून मला आनंद झाला. आपल्यासमवेत माझे सहकारी मंत्री पियुष जी, संजय जी आहेत आणि टॉयकेथॉन मध्ये सहभागी झालेले देशभरातले लोक, आणि हा कार्यक्रम पाहणारे अन्य मान्यवर आहेत याचा मला आनंद आहे.
आपल्याकडे म्हटले जाते -'साहसे खलु श्री: वसति' म्हणजे साहसातच समृद्धी वास करते. आव्हानाच्या या काळात देशाच्या पहिल्या टॉयकेथॉनचे आयोजन हीच भावना दृढ करत आहे. या टॉयकेथॉन मध्ये आपले बाल मित्र, युवा मित्र, शिक्षक, स्टार्ट अप्स आणि उद्योजकही उत्साहाने सहभागी झाले. पहिल्या वेळेलाच दीड हजारहून अधिक संघ अंतिम फेरीत सहभागी होणे म्हणजे उज्वल भविष्याचे संकेत होय. खेळणी आणि गेम्स, आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळकटी देतात. यामध्ये काही मित्रांच्या उत्तम कल्पना सामोऱ्या आल्या आहेत. काही जणांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
मित्रांनो,
गेली 5-6 वर्षे हॅकेथॉनला देशाच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा एक मोठा मंच म्हणून घडवण्यात आले आहे. देशाच्या क्षमता संघटीत करून त्यांना माध्यम उपलब्ध करून देणे हा यामागचा विचार आहे. देशासमोरच्या समस्या आणि त्यावरचे उपाय यांच्याशी देशाचा युवक थेट जोडलेला राहावा यासाठी हा प्रयत्न आहे. जेव्हा हा युवक असा संलग्न राहतो तेव्हा देशाच्या युवा वर्गाच्या प्रतिभेचे दर्शन घडते आणि देशालाही उत्तम तोडगा प्राप्त होतो. देशाच्या पहिल्या टॉयकेथॉनचाही हाच उद्देश आहे.खेळणी आणि डिजिटल गेमिंग क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि स्थानिक उपायांसाठी मी युवा वर्गाला आवाहन केले होते याचे मला स्मरण आहे. या आवाहनाला देशात अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. काही लोकांना असेही वाटते की खेळणी तर आहेत, त्याबाबत इतक्या गंभीर चर्चेची काय आवश्यकता ? खरे तर ही खेळणी, गेम्स आपली मानसिक शक्ती,आपली सृजनशीलता आणि आपली अर्थव्यवस्था अशा अनेक पैलूंवर परिणाम घडवत असतात. म्हणूनच या विषावर चर्चाही तितकीच आवश्यक आहे. आपण जाणतोच की मुलांची पहिली शाळा म्हणजे त्यांचे कुटुंब असते तर पहिले पुस्तक आणि पहिला मित्र म्हणजे ही खेळणी असतात. समाजाबरोबर मुलाचा पहिला संवाद या खेळण्यांच्या माध्यमातूनच होत असतो. आपण पाहिले असेल की मुले, खेळण्यांशी गुजगोष्टी करतात, त्यांना सूचना देतात, त्यांना कामे सांगतात. यातूनच त्यांच्या सामाजिक जीवनाची एका प्रकारे सुरवात होते. अशा प्रकारे ही खेळणी, बोर्ड गेम्स हळूहळू त्यांच्या शालेय जीवनाचाही एक महत्वाचा भाग बनतात, शिकणे आणि शिकवणे याचेही माध्यम ठरतात. याशिवाय खेळण्यांशी संबंधित आणखी एक मोठा पैलू आहे आणि प्रत्येकाने तो जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हा पैलू आहे, तो म्हणजे खेळणी आणि गेमिंग जगताची अर्थव्यवस्था- टॉयोकोनॉमी. आज आपण बोलत आहोत ती खेळण्यांची जागतिक बाजारपेठ सुमारे 100 अब्ज डॉलर्सची आहे मात्र या बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ 1.5 अब्ज इतकाच आहे. आज आपण आवश्यकतेपैकी जवळजवळ 80 टक्के खेळणी परदेशातून आयात करतो. म्हणजेच यासाठी देशाचे कोट्यवधी रुपये देशाबाहेर जातात. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. ही केवळ आकड्यांशी संबंधित बाब नाही तर देशाच्या ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशा वर्गापर्यंत विकास पोहोचवण्याचे सामर्थ्य या क्षेत्राकडे आहे. खेळण्यांशी संबंधित आपला जो कुटीर उद्योग आहे, आपली जी कला आहे, आपले जे कारागीर आहेत, ते गावे, गरीब, दलित, आदिवासी समाजात मोठ्या संख्येने आहेत. आपले हे मित्र अतिशय मर्यादित संसाधनामध्ये आपली परंपरा, आपल्या संस्कृतीला, आपल्या अत्युत्तम कलेचा साज चढवत आपल्या खेळण्यांना घडवतात. यामध्ये प्रामुख्याने आपल्या भगिनी, कन्या यांची महत्वाची भूमिका आहे. खेळण्यांशी संबंधित क्षेत्राचा विकास साधल्याने या महिलां बरोबरच देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या आदिवासी आणि गरीब मित्रांनाही मोठा लाभ होईल. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणू आणि खेळणी अधिक उत्तम घडवण्यासाठी, जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी प्रत्येक स्तरावर आपण प्रोत्साहन देऊ. यासाठी नवोन्मेषापासून ते वित्तीय पाठबळ पुरवण्यापर्यंत नवे मॉडेल विकसित करणे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक नव कल्पना रुजवायची गरज आहे. नव्या स्टार्ट अप्सना प्रोत्साहन, खेळण्यांची पारंपारिक कला, कलाकारांना नवे तंत्रज्ञान, मागणीनुसार नवी बाजारपेठ सज्ज करणेही आवश्यक आहे. टॉयकेथॉन सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनामागे हाच विचार आहे.
मित्रांनो,
स्वस्त दारात उपलब्ध असलेला डेटा आणि इंटरनेटचा वेगवान प्रसार यामुळे आज देश गावागावांपर्यंत डिजिटली जोडला जात आहे. अशा वेळी शारीरिक खेळ आणि खेळणी यांच्यासोबतच आभासी, डिजिटल तसेच ऑनलाईन गेमिंगमुळे भारतातील शक्यता आणि सामर्थ्य दोन्हीमध्ये वेगाने वाढ होत आहे. मात्र आज बाजारात जे डिजिटल खेळ उपलब्ध आहेत त्यांच्या मूळ संकल्पना भारतीय नाहीत. त्यामुळे ते खेळ आपल्या विचारांशी मिळतेजुळते नाहीत. हे तर तुम्हालाही माहित आहे की या खेळांच्या संकल्पना हिंसेला प्रोत्साहन देतात तसेच मानसिक तणावाला कारणीभूत होतात. म्हणून, ज्या डिजिटल खेळांमध्ये भारताची मूळ विचारधारा अंतर्भूत असेल, जो खेळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे विचार देईल, ज्या खेळाचे तंत्रज्ञान अत्यंत दर्जेदार असेल, त्यात गंमत असेल, निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी जो प्रवृत्त करेल अशा खेळांच्या संकल्पनांचे पर्याय आपण तयार करायला हवेत. आणि मला असे स्पष्ट दिसते आहे की, आपल्याकडे डिजिटल गेमिंगसाठी आवश्यक साहित्य आणि स्पर्धात्मक वातावरण मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या ‘टॉय-केथॉन’ मध्ये देखील आपण भारताच्या या सामर्थ्याचे स्वच्छ दर्शन घेऊ शकतो. यात ज्या संकल्पनांची निवड झाली आहे त्यात गणित आणि रसायनशास्त्र यांतील संकल्पना सोप्या रीतीने समजावून सांगणाऱ्या रचना आहेत. उदाहरणार्थ, ही आय कॉग्निटो गेमिंग जी संकल्पना तुम्ही मांडली आहे त्यात देखील भारताच्या याच क्षमतेचा समावेश आहे. योगाशी VR आणि AI तंत्रज्ञानाला जोडून जगाला एक नवा गेमिंग पर्याय उपलब्ध करून देणे हा अत्यंत उत्तम प्रयत्न आहे. याच प्रकारे, आयुर्वेदाशी संबंधित बोर्ड गेम सुद्धा नव्या-जुन्याचा अद्भुत संगम आहे. थोड्या वेळापूर्वी काही तरुणांनी चर्चेत सांगितल्याप्रमाणे हे स्पर्धात्मक खेळ योगाबद्दलची माहिती जगात सर्वदूर पोहोचविण्यात खूप मदत करू शकतात.
मित्रांनो,
भारताचे सध्याचे सामर्थ्य, भारताची कला-संस्कृती, भारतीय समाज यांना अधिक उत्तम प्रकारे जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक आहेत, त्यांना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे. अशा वेळी, आपली खेळणी आणि गेमिंग उद्योग यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक तरुण संशोधक, प्रत्येक स्टार्ट-अपला माझी अशी विनंती आहे की एका गोष्टीची तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. भारताची विचारधारा आणि भारताचे सामर्थ्य या दोन्हींचे खरे चित्र जगासमोर उभे करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत कल्पनेपासून वसुधैव कुटुंबकमची आपली शाश्वत भावना आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे. आपण आज देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, अशा वेळी, ही खेळणी आणि खेळांशी संबंधित सर्व नाविन्यपूर्ण शोध लावणारे आणि निर्माते यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अशा अनेक कहाण्या आहेत ज्या जगासमोर येणे आवश्यक आहे. आपले क्रांतिकारक, सैन्यातील जवान यांच्या शौर्याच्या, नेतृत्वाच्या कित्येक घटना खेळणी तसेच खेळांच्या संकल्पनेच्या रुपात मांडता येतील. तुम्ही भारताच्या लोकपरंपरेला भविष्याशी जोडणारा मजबूत दुवा आहात. म्हणून, आपल्या तरुण पिढीला भारतीयत्वाचे सर्व पैलू, आकर्षक आणि सुसंवादी पद्धतीने सांगू शकतील अशा खेळण्यांची तसेच डिजिटल खेळांची निर्मिती करण्यावर लक्ष एकाग्र केले पाहिजे. आपली खेळणी आणि खेळ मुलांना गुंतवून ठेवणारे, मनोरंजन करणारे आणि शिक्षित करणारे देखील असले पाहिजेत याची खात्री आपण करून घेतली पाहिजे. तुमच्यासारखे तरुण संशोधक आणि सर्जक यांच्याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमची स्वप्ने साकार कराल असा मला विश्वास वाटतो. या 'टॉय-केथॉन'च्या यशस्वी आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद !