आपल्या सर्व शेतकरी बांधवांसोबत केलेली ही चर्चा एक नवी उमेद, एक आकांक्षा जागवणारी आहे. नवा विश्वास निर्माण करणारी आहे. आज जसे आमचे मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, की बसवेश्वर जयंती आहे, परशुराम जयंती पण आहे. आज अक्षय तृतीयेचा पवित्र सण देखील आहे. आणि माझ्याकडून देशबांधवांना ईदच्या देखील शुभेच्छा !

कोरोनाच्या या काळात सर्व देशबांधवांचे धैर्य वाढावे, आणि या महामारीवर मात करण्याचा आपला सर्वांचा संकल्प अधिक दृढ व्हावा, या इच्छेसह आपल्या सर्व शेतकरी बांधवांशी माझी जी चर्चा झाली, ती आता मी पुढे नेईन. या कार्यक्रमात उपस्थित असलेले कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, सर्व मुख्यमंत्री, राज्य सरकारांचे आदरणीय मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातील माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो,

आज अत्यंत आव्हानात्मक काळात आपण हा संवाद साधतो आहोत. या कोरोना काळातही देशातल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातली त्यांची जबाबदारी पार पाडत, अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. आपण सगळे कृषी क्षेत्रात नवनव्या पद्धतींचा अवलंब करत आहात. आपल्या  या प्रयत्नांना किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता हातभार लावणार आहे. आज अक्षय तृतीयेचा पवित्र सण आहे. कृषी क्षेत्राच्या नव्या  हंगामाची सुरुवात होण्याचा हा काळ आहे आणि आजच सुमारे 19 हजार कोटी रुपये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. याचा लाभ सुमारे 10 हजार कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. बंगालच्या शेतकऱ्यांना देखील पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळण्याची सुरुवात झाली आहे. बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना आज पहिला हप्ता मिळाला आहे. जशी जशी  राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांची नावे केंद्र सरकारला मिळतील, तसतशी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढत जाईल.

मित्रांनो,

पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ विशेषतः अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना मिळतो आहे. आजच्या कठीण काळात, ही रक्कम या शेतकरी कुटुंबांना अत्यंत मदतीची ठरत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत, देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात, सुमारे 1,35,000 कोट रुपये पोचले आहेत. म्हणजेच, सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे, थेट, कोणत्याही मध्यस्थाशिवाय, शेतकऱ्यांच्या खात्यात पोचले आहेत. यात केवळ कोरोना काळातच 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये पोचले आहेत. गरजेच्या काळात, देशबांधवांना मदत मिळावी, जलद मदत मिळावी, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत संपूर्ण पारदर्शक प्रक्रियेद्वारे मदत पोचावी, असे सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

जलद गतीने थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोचवण्याचा हे काम अन्नधान्याच्या सरकारमार्फत होणाऱ्या खरेदीतही व्यापक प्रमाणात केले जात आहे. कोरोनाच्या कठीण काळातल्या आव्हानांवर मात करत शेतकऱ्यांनी यंदा अन्नधान्य आणि फळे-भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. तर, सरकार जे दरवर्षी किमान हमीभावानुसार खरेदीत नवनवे विक्रम रचते आहे.

आधी धान आणि आता गव्हाचीही विक्रमी खरेदी होत आहे. यावर्षी आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत, सुमारे 10 टक्के अधिक गव्हाची खरेदी झाली आहे. आतापर्यंत गव्हाच्या खरेदीपोटी  सुमारे 58 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.सर्वात महत्वाची बाब ही की सध्या शेतकरी जे अन्नधान्य-पिक बाजारपेठेत विकतो आहे, त्याला पूर्वीप्रमाणे, आता पैशांसाठी खूप काळ प्रतीक्षा करावी लागत नाही, त्याची चिंता करावी लागत नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचा हा पैसा, थेट त्यांच्या खात्यात जमा केला जातो आहे. मला आनंद आहे की पंजाब आणि हरियाणातील लाखो शेतकरी पहिल्यांदाच थेट लाभ हस्तांतरण मोहिमेचा भाग झाले आहेत. आतापर्यंत पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 18 हजार  कोटी रुपये आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. आपले पूर्ण पैसे बँकेत बघण्याचा आनंद काय असतो, याचा अनुभव आता पंजाब आणि हरियाणातील शेतकरी देखील घेत आहेत आणि त्याविषयी चर्चा देखील करत आहेत. मी सोशल मिडीयावर इतके व्हिडीओ पहिले आहेत, ज्यात पंजाबचे शेतकरी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाल्याचे अनुभव आणि समाधान या व्हिडीओतून व्यक्त करत आहेत.

 

मित्रांनो,

शेतीत नवे उपाय, नवे पर्याय देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. जैविक म्हणजेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, हा ही असाच एक पर्याय आहे. या प्रकारच्या पिकांना खर्चही कमी येतो. सेंद्रिय शेती, माती आणि माणसे दोघांच्याही आरोग्यासाठी लाभदायक आहे. आणि या उत्पादनांना किंमतही चांगली मिळते. अशी शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांशी मी थोड्या वेळापूर्वीचा संवाद साधला होता. त्यांचे अनुभव ऐकून मला खूप उत्साह वाटला. आज गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर सुमारे पाच किलोमीटर परिसरात, सेंद्रिय शेतील प्रोत्साहन दिले जात आहे,जेणेकरून

शेतात वापरली जाणारी रसायने पावसाच्या पाण्यासोबत गंगा नदीत वाहून होणारे नदी प्रदूषित टाळतील. हे टाळण्यासाठीच दोन्ही तटांवर पाच-पाच किमीमध्ये सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला जाईल.

ही सेंद्रिय पिके, नमामि गंगे ब्रांडसोबत बाजारात उपलब्ध करुन  दिली जात आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक, भारतीय कृषीपद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच, लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना बॅंकांकडून स्वस्त आणि सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. त्याच मालिकेत, गेल्या दीड वर्षांपासून, किसान क्रेडीट कार्ड शेतकऱ्यांना देण्यासाठी एक विशेष मोहीमच चालवली जात आहे.

या दरम्यान 2 कोटींपेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.

या कार्ड्सवर शेतकऱ्यांनी 2 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज बँकांकडून घेतलं आहे. याचा खूप मोठा लाभ पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासंबंधित शेतकऱ्यांनाही मिळणं सुरु झालं आहे.

नुकताच सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मला वाटतं माझ्या शेतकरी बंधू भगीनींना सरकारच्या या निर्णयामुळे आनंद होईल, त्यांच्यासाठी हा खूपच लाभदायक ठरेल.  कोरोना परिस्थिती पाहाता, KCC कर्जाची थकबाकी भरणं किंवा त्याच्या पुर्नगठनाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.अशा कर्जाची थकबाकी असलेले सर्व शेतकरी आता  30 जूनपर्यंत आपल्या कर्जाचं पुनर्गठन करु शकतात.

या मुदतवाढ दिलेल्या कालावधीतही शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजानं कर्ज मिळण्याचा लाभ मिळतच राहील.

मित्रांनो,

गावांचं, शेतकऱ्यांचं कोरोना  विरुद्धच्या भारताच्या लढ्यात खूप मोठं योगदान राहिलं आहे. कोरोना कालखंडात भारत जगातली सर्वात मोठी मोफत शिधावाटप योजना चालवत आहे, हे आपल्याच कष्टाचं फळ आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी आठ महीने गरीबांना मोफत शिधावाटप करण्यात आलं. यंदा मे आणि जून महीन्यात देशातल्या 80 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना रेशन मिळावं याची व्यवस्था केली आहे.

यासाठी केंद्र सरकार, 26 हजार कोटी रुपये, आपल्या गरीबांच्या घरात चूल पेटावी, यासाठी खर्च करत आहे. मी राज्य सरकारांना आग्रह करतो की गरिबांना शिधावाटपात कोणतीही अडचण येऊ नये याची खातरजमा करुन घ्या.

मित्रांनो,

100 वर्षांनी आलेली ही भीषण महामारी पावला पावलांवर जगाची परिक्षा घेत आहे.

आपल्या समोर एक अदृश्य शत्रू आहे. आणि शत्रू बहुरुपी देखील आहे. या शत्रूमुळे, या कोरोना विषाणूमुळे आपण आपल्या अनेक जिवलगांनाही गमावलं आहे. गेल्या काही काळापासून जो त्रास देशवासीयांनी सोसला आहे, अनेकजण ज्या दु:खवेदनेतून गेले आहेत, मलाही ती सहवेदना जाणवत आहे. देशाचा प्रधान सेवक या नात्यानं आपल्या प्रत्येक भावनेत मी सहभागी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संसाधनांसंदर्भात जे अडथळे होते, ते वेगाने दूर केले जात आहेत. युद्धपातळीवर काम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण पाहिलंच असेल, सरकारचे सर्व विभाग, सारी संसाधनं, आपल्या देशाची सुरक्षा दलं, आपले शास्त्रज्ञ, प्रत्येकजण कोविडच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अहोरात्र एकजुटीनं झटत आहेत. देशाच्या विविध भागात वेगानं कोविड रुग्णालयं उभारली जात आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं प्राणवायू प्रकल्प सुरु केले जात आहेत. 

आपली तिनही सैन्यदलं- वायुसेना, नौसेना, लष्कर सर्वच या कामात पूर्ण शक्तीनं सहभागी झाली आहेत. ऑक्सीजन रेल्वेनं, कोरोना विरोधातल्या या लढाईला खूप मोठं बळ दिलं आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात या विशेष रेल्वेगाड्या, या ऑक्सीजन रेल्वे प्राणवायू पोहचवत आहेत.

प्राणवायू टँकर्स घेऊन जाणारे चालक अविरत काम करताहेत. देशातील डॉक्टर्स असो, वैद्यकीय कर्मचारीवृंद असो, सफाई कर्मचारी, रुग्णवाहीकांचे चालक, प्रयोगशाळांमधले कर्मचारी असोत, नमुने गोळा करणारे असोत, एक-एक जीव वाचवण्यासाठी हे चोवीस तीस झटत आहेत. आज देशात आवश्यक औषधांचा पुरवठा वाढवण्यासाठी युध्दपातळीवर काम केलं जात आहे. सरकार आणि देशातील औषधनिर्माण क्षेत्रानं गेल्या काही दिवसात आवश्यक औषधांचं उत्पादन अनेक पटीनं वाढवलं आहे. बाहेरुनही औषधं मागवली जात आहेत. या संकटसमयी देखील, औषधं आणि आवश्यक वस्तूंची साठेबाजी तसेच काळाबाजार करण्यात काही स्वार्थी लोक गुंतले आहेत. मी राज्य सरकारांना आग्रह करतो की अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. हे कृत्य मानवते विरोधातलं आहे.  भारत हिम्मत हारणारा  देश नाही. ना भारत हिम्मत हारेल, ना एकही भारतीय हिम्मत हारेल. आपण लढू आणि जिंकूही.

मित्रांनो,

आजच्या या कार्यक्रमात, मी देशातल्या  सर्व शेतकरी, गावात राहाणारे सर्व बंधू भगीनी यांना कोरोनाबाबत पुन्हा सतर्क करतो. हे संक्रमण आता गावातही वेगानं पसरु लागलं आहे. देशातलं प्रत्येक सरकार यावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यात गावकऱ्यांची जागरूकता, आपल्या पंचायती राज संबंधित व्यवस्थांचं सहकार्य, त्यांची भागीदारी तितकीच आवश्यक आहे. तुम्ही देशाला कधीच निराश केलेलं नाही, यावेळीही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. कोरोनापासून सुरक्षित राहाण्यासाठी तुम्हाला स्वत:, आपल्या कुटुंबपातळीवर,  सामाजिक स्तरावर जी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे,ती उचलावीच लागतील. मास्कचा सतत वापर खूप गरजेचा आहे. तो ही असा घालायचा की नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलेलं राहिल. दुसरी गोष्ट, आपल्याला कोणत्याही प्रकाराचा खोकला, सर्दी, ताप, उल्टी-जुलाब, यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही. पहिलं तर, दुसऱ्यापासून शक्य तितकं दूरच राहायचं. त्यानंतर लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यायची. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोवर डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत राहा़यचं.

मित्रांनो,

सुरक्षित राहाण्याचं सर्वात मोठं माध्यम आहे, कोरोना प्रतिबंधक लस. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं मिळून जास्तीतजास्त देशवासीयांचं लवकरात लवकर लसीकरण व्हावं यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत.

देशभरात आतापर्यंत सुमारे 18 कोटी लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.  देशभरातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे तुमचा क्रमांक येईल तेव्हा अवश्य लस घ्या. ही लस अपल्याला कोरोना विरोधात  सुरक्षा कवच देईल, गंभीर आजाराची शक्यता कमी करेल. आणि हो, लस घेतल्यानंतरही मास्क आणि सुरक्षित अंतर हा मंत्र आपण सोडायचा नाही. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi