बंधू-भगिनींनो, आज संथालच्या भूमीवर येण्याचे मला सौभाग्य लाभले आहे. भगवान बिरसा मुंडा, चांद भैरव, निलांबर-पितांबर यांच्यासारख्या वीर सुपुत्रांची ही भूमी. या भूमीला मी वंदन करतो आणि या भूमीतील वीर नागरिकांनाही मी मनापासून अभिवादन करतो. आज झारखंडमध्ये साहिबगंजच्या भूमीवर एकाच वेळी सप्तधारा विकासाच्या योजनांचा शुभारंभ होत आहे. संथाल मध्ये या परिसरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या विकास योजना बहुधा स्वातंत्र्यानंतर एखाद्या कार्यक्रमातून या क्षेत्राच्या विकासासाठी प्रथमच केल्या असतील असे मला वाटते. या संपूर्ण संथाल परिसराचे जर भले करायचे असेल तर येथील समस्या सोडवायला हव्यात, येथील गरीबातील गरीब माझे आदिवासी बंधू-भगिनी, माझे मागास बंधू-भगिनी जर यांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर त्याचा एकच उपाय आहे. आणि तो उपाय आहे, विकास. जितक्या वेगाने आपण विकास इथे करू, येथील सामान्य माणसाचे आयुष्य बदलण्यात आपण यशस्वी होऊ.
आज एक खूप मोठा महत्वपूर्ण कार्यक्रम झारखंड आणि बिहारला जोडणार आहे. गंगा नदीवर दोन राज्यांना जोडणारा सर्वात मोठा पूल २२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे आणि तो केवळ दोन राज्यांना जोडतोय असे नाही तर विकासाचे नवीन दार उघडणार आहे. इथून पूर्व भारताच्या विशाल फलकाबरोबर स्वतःला जोडण्याची या पुलामुळे तुम्हाला संधी मिळत आहे.
मी बिहारवासियांचे अभिनंदन करतो. मी झारखंडवासियांना शुभेच्छा देतो, एका महत्वपूर्ण पुलाचे आज भूमिपूजन होत आहे आणि आमचे नितीन गडकरीजी , हे असे मंत्री आहेत जे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात खूप कुशल आहेत. आणि म्हणूनच मला पक्की खात्री आहे कि ज्या तारखेला याचे लोकार्पण ठरेल त्या तारखेच्या आत संपूर्ण काम पूर्ण करून दाखवतील. अशी खोळंबणारी कामे राहणार नाहीत.तुम्ही कल्पना करू शकता या भागातील किती युवकांना रोजगार मिळेल. आणि तुमच्याच जिल्ह्यात संध्याकाळी जर घरी परतायचे असेल तर सहज जाऊ शकाल. तिथे त्यांना रोजगारही मिळेल , त्याचबरोबर हे असे काम आहे कि त्यांचा कौशल्य विकास देखील होईल.
एक नवीन कला , कौशल्य, जेव्हा दोन-अडीच वर्षे सातत्याने एका प्रकल्पावर केंद्रित होते, तेव्हा एखाद्या इंजिनिअरपेक्षा देखील अधिक काम करण्याचे बळ त्याच्यात येते. या परिसरात या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबियांचे तरुण असे बळ प्राप्त करतील. जे आगामी काळात झारखंड असेल, बिहार असेल, भारतातील अन्य कुठलाही भाग असेल, तिथेही जर असे काही प्रकल्प आले तर या परिसरातील युवकांना पहिली पसंती मिळेल आणि लोकांना जास्त पैसे देऊन आपल्याकडे काम करण्यासाठी घेऊन जातील. हे सामर्थ्य यातून निर्माण होणार आहे. आणि या संपूर्ण प्रकल्पामध्ये सर्वात मोठी जी ताकद आहे ती आहे मानवी शक्तीचा सुनियोजित प्रकारे कौशल्य विकास करून विकास करणे आहे.
मी येथील युवकांना शुभेच्छा देतो. तुमच्या अंगणात ही शुभ संधी आलेली आहे. तुम्ही देखील मनात निश्चय करा, मेहनत देखील करायची आहे आणि आपली क्षमता देखील वाढवायची आहे. आणि एकदा का क्षमता वाढली कि जग तुम्हाला विचारत येईल कि इथे जो अनुभवी युवक आहे त्याची आम्हाला गरज आहे. हा बदल होणार आहे. आज मला इथे आणखी एका कार्यक्रमाचे देखील लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आणि ती आहे साहिबगंज ते गोविंदपूर पर्यंत जो रस्ता बांधला आहे त्याचे लोकार्पण करायचे आहे. पूर्वी इथून गोविंदपूरला जायचे असेल तर १० तास, १२ तास, १४ तास लागायचे. आता हा जो नवीन रस्ता बांधला आहे , पाच, सात तासात तुम्ही गोविंदपूरला पोहोचू शकता. किती मोठा वेग आला आहे तुमच्या आयुष्यात यामुळे, किती मोठा बदल झाला आहे आणि हा केवळ रस्ता नाही, संपूर्ण संथाल परिसरातून निघणारा हा केवळ रस्ता नाही तर पूर्ण संथाल परिसरातील गरीबातील गरीब नागरिकांच्या आयुष्यात विकासाचा एक नवीन मार्ग खुला करत आहे. विकासाची नवी दिशा खुली करत आहे . विकासाचे एक नवीन उद्दिष्ट जवळ आणून ठेवत आहे. आणि म्हणूनच रस्ते खूप तयार होतात, वाहतुकीसाठी त्यांचा उपयोग होतो, मात्र हा रस्ता त्या रस्त्यांपैकी नाही, तो केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नाही तर विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा एक मार्ग बनत आहे आणि जो संपूर्ण संथाल परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकील. हा मला ठाम विश्वास वाटतो.
बंधू-भगिनींनो, नदीला आपण आई म्हणतो. आणि आई आपल्याला सगळे काही देते, मात्र कधी-कधी असेही म्हटले जाते कि मागितल्याशिवाय आई देखील जेवू घालत नाही. गंगा माता शतकानुशतके या संपूर्ण परिसराला नव्याने पल्लवित करत आहे. ती जीवनधारेच्या रूपात वाहत आहे. मात्र बदलत्या युगात ही गंगा माता आपल्या जीवनाला एक नवीन ताकदही देऊ शकते. २१ व्या शतकाच्या जगात ही गंगा माता झारखंडला जगाशी थेट जोडण्याच्या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. तुम्ही कधी कल्पना केली होती कि समुद्र किनारी जी शहरे असतात, राज्ये असतात ती तर आपोआप थेट जगाशी जोडली जातात मात्र जमिनीने वेढलेला झारखंड सारखा भाग ज्याच्या आसपास कुठेही समुद्र नाही. तो देखील जगाशी जोडला जाऊ शकतो. ज्या प्रकल्पावर आमचे नितीन गडकरीजी काम करत आहेत आणि अगदी मनापासून करत आहेत. आणि त्यामुळे सर्वात मोठे काम होणार आहे. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे झारखंड थेट संपूर्ण जगाशी जोडण्याची ताकद बनेल.
आणि तो प्रकल्प आहे, गंगा नदीत मल्टि मॉडेल टर्मिनलचे भूमिपूजन. इथून बंगालच्या खाडीपर्यंत जहाजे जातील, गंगेतून जहाजे जातील, माल वाहून घेऊन जातील आणि येथील वस्तू थेट बंगालच्या खाडीतून निघून सागरी मार्गाने थेट जगभरात पोहोचू शकतील. व्यापारासाठी, जागतिक व्यापारासाठी जेव्हा अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात तेव्हा जागतिक व्यापारात झारखंडचे स्वतःचे स्थान निर्माण होऊ शकते. मग ते येथील स्टोन चिप्स असतील, इथला कोळसा असेल किंवा येथील अन्य उत्पादने असतील. जगभरातील बाजारात थेट पोहोचण्याचे सामर्थ्य यात येऊ शकते. एवढेच नाही तर ही व्यवस्था बनल्यानंतर जर येथील कोळसा पश्चिम भारतात घेऊन जायचा असेल, तर आवश्यकता नाही कि तो रस्ते किंवा रेल्वेतून नेण्यात यावा. तो बंगालच्या खाडीतून सागरी मार्गाने तिथे नेणे स्वस्त पडेल. आणि जे या क्षेत्रात काम करत असतील त्यांची आर्थिक ताकद वाढवण्यात उपयोग होईल.
बंधू-भगिनींनो, आपल्या देशात महामार्गाची चिंता होती, अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते तेव्हा आपल्या देशाच्या पायाभूत विकासात दोन महत्वपूर्ण ऐतिहासिक योगदान अटलजींच्या सरकारने दिले, मी दोन म्हणतो, आणखी शेकडो असतील. एक, त्यांनी संपूर्ण भारताला सुवर्ण चतुष्कोणाशी जोडून पायाभूत क्षेत्राला आधुनिक स्वरूप देण्याचा एक यशस्वी प्रयोग केला. पूर्ण केला. दुसरे, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना ज्याद्वारे भारतातील गावागावांना, ज्याप्रमाणे शरीरात वेगवेगळ्या शिरा आणि धमन्या असतात, त्याप्रमाणे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेद्वारे रस्त्यांचे संपूर्ण जाळे उभे करण्याचा विडा उचलला. खूप मोठे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. नंतरही जी सरकारे आली, त्यांनीही तो कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. हे वाजपेयीजींचे दुसरे योगदान होते.
बंधू-भगिनींनो,पायाभूत विकासाचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा आपण रस्त्याची चिंता चर्चा केली. महामार्ग तयार केले, आम्ही विमानांसाठी विमानतळ बनवणे त्याची व्यवस्था उभारली. आम्ही रेल्वेच्या विस्तारासाठी काम केले. मात्र एक क्षेत्र आम्हाला आव्हान देत होते. विद्यमान सरकारने नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे कि आपल्या देशात पाण्याने भरलेल्या ज्या नद्या आहेत त्यातून वाहतूक करून कमी खर्चात मालवाहतुकीचे अभियान चालवणे आणि त्याच अंतर्गत बनारस ते हल्दिया पर्यंत माल घेऊन जाण्यासाठी संपूर्ण व्यवस्था विकसित होत आहे. झारखंडला बंगालच्या खाडीपर्यंत जोडण्यात येत आहे. इथून जहाजे जातील. नदीमध्ये छोट्या छोट्या होडया तर आपण खूप पाहिल्या आहेत. हजारो टन माल घेऊन जाणारी जहाजे चालतील. तुम्ही कल्पना करू शकता विकासाचे कोणते नवीन क्षेत्र आपल्यासमोर उदयाला येत आहे. महामार्ग आहेत, हवाई मार्ग आहेत, रेल्वे आहे, आता तुमच्यासमोर आहे जलमार्ग. हा जलमार्ग, याच्या शुभारंभाचे भूमिपूजनाचे काम आज होत आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतात हे संपूर्ण अभियान नव्याने होत आहे. आणि म्हणूनच याची प्रशंसा होणार आहे. आगामी काळात अर्थतज्ञ यावर लिहिणार आहेत. यावर चर्चा करणार आहेत कि भारताच्या पायाभूत क्षेत्रात पर्यावरण-स्नेही पायाभूत विकासाच्या दिशेने कसे पुढे जात आहेत. पर्यावरणाचेही रक्षण होईल, विकासही होईल, वाहतूकही होईल, गतीही मिळेल असे काम व्हावे त्या दिशेने वेगाने काम वाढवण्यासाठी नितीनजींचा विभाग आज काम करत आहे. गंगा माता सर्व काही देत होती. आता एक नवीन भेट गंगा मातेकडून, विकासाचा एक नवीन मार्ग आपल्यासाठी सादर होत आहे. यासाठी माता गंगेचे जितके आपण ऋणी राहू तितके कमीच असेल.
बंधू-भगिनींनो, मी आज झारखंडचे मुख्यमंत्री श्री. रघुवर दास यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी या संथाल परिसरातील शेतकऱ्यांसाठी, पशुसंवर्धन करणाऱ्यांसाठी एक खूप मोठे महत्वाचे पाऊल उचलले आहे. आणि ते आहे दुग्ध व्यवसायाचे. पशु संवर्धन करणाऱ्यांचे दूध जर हमी भावावर विकले गेले तरच तो पशुसंवर्धन करेल, चांगल्या प्रकारे पशुसंवर्धन करेल. आज तो पशुपालन करतो, कुटुंबाची दुधाची गरज पूर्ण करतो किंवा गावात शेजारी-पाजारी थोडे देतो. मात्र याचे व्यावसायिक स्वरूप त्याच्या डोक्यात येत नाही. जेव्हा दुग्धशाळा बनते, तेव्हा गरीब शेतकरी, गरीब पशुसंवर्धन करणाऱ्यांनाही त्याद्वारे दूध उत्पादन आणि त्याचे मूल्यांकन करून बाजारात एक खूप मोठी साखळी तयार होते. मी गुजरातच्या मातीतून आलो आहे. अमूल देखील तिथलाच ओळखला जातो.भारतातील कोणताही कानाकोपरा असा नसेल जिथे अमूल पोहोचले नसेल. हे अमूल नक्की आहे काय? कधी काळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटीशी मंडई बनवली. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध गोळा करून काम सुरु केले. आणि पाहता-पाहता त्याचा पसारा वाढत गेला. आणि आज अमूलचे नाव जगभरात आहे. आज रघुवीर दासजी या संथालच्या गरीब शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन करणाऱ्यांसाठी त्या दुग्धशाळेचे भूमिपूजन करत आहेत. ज्यामुळे आगामी काळात लाखो कुटुंबांच्या दुभत्या जनावरांचे दूध, त्यावरील प्रक्रिया, त्याचे विपणन, ब्रॅण्डिंग आणि पशुसंवर्धन करणाऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य भाव मिळेल. रोजच्या रोज भाव मिळेल. त्या दिशेने काम करण्याचा निर्णय घेत आहोत. माझ्या त्यांना खूप-खूप शुभेच्छा. दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गुजरातच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राला बराच अनुभव आहे. जर झारखंडला गुजरातकडून काही मदत लागली तर मी अवश्य तेथील लोकांना सांगेन कि त्यांनीही तुमची मदत करावी आणि येथील पशुसंवर्धन करणाऱ्यांसाठी, येथील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठे काम होईल. त्यांच्या आयुष्यात एक नवीन जोडधंदा मिळेल कारण जमीन कधी-कधी कमी असते. मात्र जर पशुसंवर्धन चांगल्या प्रकारे चालले तर त्याला एक बळ मिळेल. आणि मी मुख्यमंत्र्यांना आणखी एक गोष्ट सांगेन कि जसा त्यांनी दुग्धव्यवसायासाठी विडा उचलला आहे, त्याच बरोबरीने ते मधाचा उद्योग देखील करू शकतात. मधमाशी पालनाच्या माध्यमातून जो पशुसंवर्धन, दूध उत्पादन करतो, तो मधाचे उत्पादन देखील करू शकतो. आणि दुग्धव्यवसायाप्रमाणे मध देखील गोळा केला जाऊ शकतो. आणि मधाचीही जागतिक बाजारपेठ बनू शकते. आपला शेतकरी दुधापासूनही कमाई करू शकेल, मधापासूनही कमाई करू शकेल, आणि शेतीच्या पिकापासूनही कमाई करू शकेल. बाराही महिने त्याला त्याच्या उत्पन्नाची हमी मिळेल. मला विश्वास आहे कि रघुवीर दास यांनी अतिशय दूरदृष्टीने, भले आज ते काम छोटे वाटत असेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेव्हा प्रेरणा घेऊन काम करवून घेतले, खूप छोटे वाटत होते. मात्र आज ते काम जगभरात प्रसिद्ध आहे. रघुवीरदासजींनी छोट्याशा कामाचा शुभारंभ केला आहे, त्याची भविष्यातील ताकद किती असेल त्याचे चित्र माझ्या डोळ्यासमोर आणू शकतो. आणि संपूर्ण संथाल परिसराचे भाग्य बदलण्यात, प्रत्येक पशुसंवर्धन शेतकऱ्याचे भाग्य बदलण्यात ते उपयोगी ठरेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो.
बंधू-भगिनींनो, २ ऑक्टोबर २०१५ रोजी मला न्यायमूर्ती डीएन पटेल यांच्या निमंत्रणावरून खुटी येथे येण्याचे सौभाग्य लाभले. आणि खुटी येथील न्यायालय देशातील पहिले सौर उर्जेवर चालणारे न्यायालय बनले. सूर्याच्या शक्तीपासून मिळालेल्या विजेद्वारे त्या न्यायालयाचा संपूर्ण कारभार चालत आहे. आज मला आनंद वाटतो कि पुन्हा एकदा साहिबगंज येथे एका सरकारी यंत्रणेचा परिसर आणि दुसरे न्यायालय दोन्ही पूर्णपणे सूर्याच्या शक्तीपासून चालणारे बनत आहेत. यासाठी मी न्यायमूर्ती डीएन पटेल आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो आणि झारखंड सरकारचेही अभिनंदन करतो. त्यांनी सौर उर्जेला प्रोत्साहन दिले आहे. छतावरील सौर ऊर्जेचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुमारे ४५०० किलोवॅट सौर ऊर्जा स्थापित करण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. जर आपल्याला आपली जंगले वाचवायची असतील, आपल्या भावी पिढीसाठी काही देऊन जायचे असेल तर आपल्याला आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करावे लागेल. आणि ऊर्जेचा कुठला उत्तम स्रोत जो आपल्याला सहज उपलब्ध आहे तो आहे सौर ऊर्जा. सूर्य शक्ती. आणि सौर ऊर्जेच्या दिशेने आज भारत वेगाने पुढे जात आहे. भारताने स्वप्न पाहिले आहे. १७५ गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे, त्यापैकी १०० गिगावॅट सौर ऊर्जा , भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सूर्याच्या शक्तीपासून ऊर्जा मिळेल यावर भर दिला जात आहे. आज आपल्याला परदेशातून ऊर्जेची खरेदी करावी लागत आहे. त्यात खूप मोठी बचत होईल, ते पैसे गरीबाच्या उपयोगी येतील. आज पर्यावरणाचे जे नुकसान होत आहे, त्यात आपल्याला दिलासा मिळेल. आणि सौर शक्तीच्या दिशेने, एक काळ होता, सौर ऊर्जेच्या एक युनिट ऊर्जेची किंमत १९ रुपये होती. मात्र भारताने ज्याप्रकारे अभियान चालवले, आज अशी स्थिती आहे कि कोळशापेक्षाही सौर ऊर्जा स्वस्तात मिळत आहे. अलिकडेच ज्या निविदा निघाल्या केवळ तीन रुपयांच्या निघाल्या, २ रुपये ९६ पैसे. म्हणजेच एक प्रकारे एकदा गुंतवणूक खर्च केला कि नंतर एकही पैसा खर्च न करता आपण वीज मिळवू शकतो.
आणि बंधू-भगिनींनो, २१ व्या शतकात कुणाही नागरिकाला अंधारात जगण्यासाठी प्रवृत्त करता येणार नाही . अनेक कुटुंबे आहेत जे आजही घरांमध्ये वीज जोडणी घेत नाहीत. त्यांना वाटते काय गरज आहे. समजावल्यावर घेतात. सरकार मोफत जोडणी देते तरीही कधी कधी लोक स्वतः उदासीन असतात. अशा कुटुंबाना मुलांच्या शिक्षणासाठी भारत सरकारने छोटासा सौर बॅटरीवर चालणारा छोटा दिवा टेबलवर लावला किंवा जमिनीवर लावून अभ्यास करायचा असेल तर करू शकतो. लाखो अशा गरीब कुटुंबांना देण्याच्या दिशेने मोठा विडा उचलला आहे. आपला शेतकरी जिथे जमिनीतून पाणी काढून शेती करतो, त्याला वीज महागात पडते. आता आम्ही सौर पंप बसवणार आहोत. शेतकरी सौर पंपाद्वारे जमिनीतून पाणी काढेल. सूर्यापासून बॅटरीही चार्ज होत राहील, पाणीही निघत राहील. शेतही हिरवेगार राहील. दोन पिके घेतो, तीन पिके घ्यायला लागेल. त्याचे उत्पन्न जे दुप्पट करायचे आहे त्यात हे सौर पंप उपयोगी पडतील. एक खूप मोठे क्रांती घडवून आणण्याचे काम सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत सरकारकडून केले जात आहे. झारखंड सरकारनेही खांद्याला खांदा लावून भारत सरकारच्या बरोबरीने चालण्याचा विडा उचलला आहे. सौर उर्जेला बळ देत आहेत. छतावरील सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला पुढे नेत आहेत. मी यासाठीही झारखंडचे अभिनंदन करतो. आणि मी सर्व देशबांधवानाही सांगेन कि आपण ऊर्जेच्या क्षेत्रात संवेदनशील बनायला हवे. आपण ऊर्जेचे महत्व समजायला हवे. आणि भावी आयुष्याचे संरक्षण देखील समजून घ्यायला हवे. आता संपूर्ण देशात एलईडी दिव्यांचे एक अभियान सुरु आहे. जर कुणी सरकार आपल्या अर्थसंकल्पात असे म्हणेल कि आम्ही दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करतो आणि हे दहा हजार कोटी रुपये जनतेत वाटून टाकले, तर वाहवा होईल, टाळ्या वाजवल्या जातील, वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे बातमी छापली जाईल. वाह, मोदी किती चांगले पंतप्रधान आहेत. दहा हजार कोटी रुपये लोकांना वाटणार आहे. बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही असे एक काम केले आहे जे दहा हजार कोटींहून अधिक तुमच्या खिशात भरत आहे. भारताच्या नागरिकांच्या खिशात जात आहेत. काय केले, एलईडी दिवे लावा वीज वाचवा. विजेचे बिल कमी करा. आणि तुमच्यापैकी कुणाचे वर्षाचे अडीचशे वाचतील, कुणाचे वर्षाचे हजार वाचतील, कुणाचे वर्षाचे दोन हजार वाचतील, ते गरीब मुलांना दूध पाजण्यासाठी उपयोगी पडतील. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. आम्ही सरकारमध्ये आलो, तेव्हा एलईडी दिवे साडे तीनशे चारशे रुपयांना विकले जायचे. आज ते एलईडी दिवे पन्नास साठ रुपयात विकले जात आहेत. आणि देशभरात सरकारकडून २२ कोटी दिवे वितरित करण्यात आले आहेत. आणि लोकांनी स्वतः केले आहे, दोन्ही मिळून सुमारे ५० कोटी नवीन एलईडी दिवे लोकांच्या घरात लागले आहेत. आणि यातून विजेची जी बचत झाली आहे, ती सुमारे ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हे ११ हजार कोटी रुपये जे विजेचा अपव्यय करतात त्यांच्या खिशात वाचणार आहेत. किती मोठी क्रांती येते जेव्हा आपण छोट्याशा बदलांसह काम करू शकतो. तर वीज वाचवणे दुसऱ्या बाजूला, सौर ऊर्जेचा उपयोग करणे एक प्रकारे स्वस्त विजेच्या दिशेने जाणे, ज्याला ३६० अंश म्हणूया, तसे ऊर्जेचे एक पूर्ण जाळे तयार करून सरकार आज काम करत आहे. आणि त्याचाही तुम्हाला लाभ मिळेल.
मला आज समोर इथे तरुण दिसत आहेत. त्यांच्या डोक्यावर टोपी आहे, टोपीवर पिवळी फुले लावली आहेत. खूप छान दिसत आहेत. ही आपल्या आदिवासी जातीतील मुले आहेत.. त्यांच्या कुटुंबामध्ये अजूनपर्यंत सरकारमध्ये काम करायचे सौभाग्य लाभलेले नाही. सर्वानी टाळ्या वाजवून यांचे अभिनंदन करा.मी थोडारजी यांच्या नव्या उपक्रमासाठी आणि यांच्या मौलिक चिंतनासाठी अभिनंदन करतो , त्यांनी या डोंगराळ भागातील मुलांची निवड केली. सरकारी नियमांमध्ये बदल केले. त्यांची उंची कमी होती, त्यातही तडजोड केली. त्यांचे शिक्षण कमी होते ते देखील सांभाळून घेतले. आणि त्यांना प्रशिक्षण देऊन तुमच्या सुरक्षेच्या कामावर लावले. ते एक प्रकारे सरकार बनले आहेत. बंधू भगिनींनो भारताच्या शेवटच्या टोकाला बसलेल्या लोकांची जी गणना होते त्यात ही माझी मुले आहेत. या डोंगराळ भागातील मुली आहेत, आज त्या मुख्य प्रवाहात येत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. आणि मी पाहत होतो, त्या मुली जेव्हा आपले प्रमाणपत्र घ्यायला आल्या होत्या, त्यांची येण्याची पद्धत, त्यांची सलाम करण्याची पद्धत, प्रसारमाध्यमांना उत्तर देण्याची त्यांची पद्धत, त्यांचा आत्मविश्वास पाहून मला वाटत आहे कि त्या आपला गौरव बनतील. हे पहाडी समुदायाचे माझे सहकारी, माझे युवक झारखंडच्या भाग्याला सुरक्षा देणारी एक नवीन ताकद बनतील. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा गौरव करूया. रघुवर दास जी यांचेही अभिनंदन करा, त्यांनी एवढे मोठे महत्वपूर्ण काम केले आहे. समाजाच्या शेवटच्या टोकाला जे आदिवासींपेक्षा गरीब आहेत, आदिवासींपेक्षा मागासलेले आहेत. चार चार पिढ्यांपर्यंत ज्यांना शाळेत जाण्याची संधी मिळालेली नाही, अशी सर्व मुले आज आपल्यासमोर आहेत. यामुळे किती आनंद होत आहे. आज जीवन धन्य झाले या मुलांना पाहून आणि हेच माझ्या भारताचा पाया बनणार आहेत, माझ्या बंधू-भगिनींनो. हाच माझा नवीन भारत आहे. देशातील गरीबातील गरीब भारताच्या विकास यात्रेत सहभागी होईल याचे हे उदाहरण आहे.
बंधू-भगिनींनो, काही महिला आज मंचावर आल्या होत्या. तुम्हाला लांबून दिसत होते कि नाही मला माहित नाही. झारखंड सरकारच्या वतीने मी त्यांना मोबाईल फोन देत होतो. आणि मी पाहत होतो कि त्या मला माझ्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत होत्या. त्यांना माहित होते, कि अँप काय असते, भीम अँप काय आहे. अँप कसे डाउनलोड करायचे. आर्थिक व्यवहार या मोबाईल फोनद्वारे कसे करायचे त्यांना सगळे माहित होते. मला खूप आनंद झाला. संसदेत आमचे जे सहकारी आहेत ते कधी कधी म्हणतात कि भारतातील गरीबाला मोबाईल फोन कसा कळणार, कुठे शिकेल, कुठे वापरेल. संसदेतील सहकाऱ्यांना भेटेन तेव्हा त्यांना मी नक्की सांगेन कि मी भारतातील अतिमागास भाग संथाल इथे गेलो होतो, आणि तेथील माझ्या आदिवासी भगिनी मोबाईल फोनचा काय उपयोग असू शकतो, ते मला शिकवत होत्या. ही क्रांती आहे. ही डिजिटल भारताची क्रांती आहे. ही रोकडरहित समाजाची क्रांती आहे. आणि नोटबंदीनंतर प्रत्येकाला वाटत होते कि आता आपण आपल्या मोबाईल फोनवरून आपल्या मोबाईल फोनला आपली बँक बनवू शकतो. छोटी छोटी सखी मंडळे, त्यांचा कारभार, त्यांच्यात एक प्रमुख भगिनी, तिच्या हातात मोबाईल फोन तिचा मोबाईल फोन बँकेशी जोडलेला, मोबाईल फोन तिच्या ग्राहकांशी जोडलेला अशी एक संपूर्ण नवी क्रांती या उपक्रमामुळे येत आहे. मी या संथाल परिसरातील सखी मंडळाच्या भगिनींचे अभिनंदन करतो. माझा खूप जुना एक अनुभव आहे. तो अनुभव आजही मला प्रेरणा देतो. मी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो. दक्षिण गुजरातमध्ये आदिवासी वस्तीत खूप दूर कापरारा म्हणून एक परिसर आहे. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो पण तिथे जाणे व्हायचे नाही. कारण त्या भागात अशी कधी संधी यायची नाही, सभेसाठी दोन मैदानही नव्हती, पूर्ण जंगलच जंगल होते. आणि एक घर इथे तर दुसरे घर दोन मैल दूर, तिसरे घर तीन मैल दूर. मी ठरवले, नाही मला जायचेच आहे. तिथे आम्ही दुग्ध व्यवसायाचे एक छोटेसे काम सुरु केले. एक शीतगृह बांधले. दूध थंड करण्याची जी व्यवस्था असते. दुग्धशाळेत नेण्यापूर्वी थोडा वेळ जिथे दोन चार तास दूध ठेवायचे असेल तर ते तिथे ठेवले जायचे. छोटासा प्रकल्प असतो. २५-५० लाखात तयार होतो. मी म्हटले मी त्या प्रकल्पासाठी येईन. तेव्हा आमचे सगळे लोक नाराज झाले. साहेब एवढे दूर पन्नास लाखाच्या कार्यक्रमासाठी, मी म्हटले मी जाणार. मला जायचे आहे. मी गेलो, आता ती जागा अशी होती कि तिकडे सभा तर होऊ शकत नव्हती. सभा तीन चार किलोमीटर दूर शाळेच्या मैदानात होती. मात्र दूध भरण्यासाठी ज्या महिला यायच्या, त्या आपल्या भांड्यात दूध घेऊन आल्या होत्या. त्या शीतगृहात आल्या होत्या. दूध भरण्याचा कार्यक्रम झाला. आणि नंतर मी पाहिले त्या महिलांनी आपले जे भांडे होते ते बाजूला ठेवले आणि मोबाईल फोनवर माझे फोटो काढत होत्या. सुमारे तीस महिला होत्या. प्रत्येकीच्या हातात मोबाईल होता. आणि तोही फोटो काढण्याचा मोबाईल होता. त्या फोटो काढत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो, माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते. एवढ्या मागास भागात आदिवासी महिला दूध भरण्यासाठी आल्या आहेत, गावात शेतकरी आहेत. मी जाऊन विचारले तुम्ही काय करत आहात. त्या म्हणाल्या तुमचा फोटो काढत आहोत, मी म्हटले फोटो काढून काय करणार. तर म्हणाल्या ते आम्ही डाउनलोड करणार. त्यांच्या तोंडून डाउनलोड शब्द ऐकून मी हैराण झालो. कधीकधी मोठमोठ्या लोकांनाही माहित नसते कि भारतातील सामान्य माणसामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आधुनिकता पकडण्याची ताकद किती मोठी असते. आणि मला आज दुसऱ्यांदा या माझ्या आदिवासी भगिनींकडे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या आम्ही डिजिटल क्रांतीचा प्रवाह बानू. आम्ही हे काम करूनच दाखवू. मी या सर्व सखी मंडळांना आणि मोबाईल फोनद्वारे संपर्काच्या माध्यमातून एका डिजिटल क्रांतीचा सैनिक बनण्याचे जे अभियान सुरु आहे यासाठी मी झारखंड सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो. काळ बदलला आहे. बदलत्या काळात आपण कशा प्रकारे पुढे जायला हवे, त्या दिशेने जायला हवे.
बंधू भगिनीनो, भारतातील गरीबाला सन्मानाने जगायचे आहे. भारतातील आदिवासी, दलित, पीडित, शोषित सन्मानाने आयुष्य जगू इच्छितात. ते कुणाच्या कृपेने काही शोधत नाहीत. त्यांची तरुण मुले म्हणत आहेत कि आम्हाला संधी द्या, मी माझी भाग्यरेषा स्वतः लिहीन. ही ताकद माझ्या गरीब आदिवासींच्या मुलांमध्ये आहे, दलित, पीडित, शोषितांच्या मुलांमध्ये आहे . आणि माझी संपूर्ण शक्ती मी या मुलांच्या मागे लावत आहे. या तरुणांच्या मागे लावत आहे. जेणेकरून तेच भारताचे भाग्य बदलण्यासाठी एका नवीन शक्तीच्या रूपात सहभागी होतील. एका नवीन शक्तीच्या रूपाने देशाचे भाग्य बदलण्यात सहभागी होतील. आणि भारताचे भाग्य बदलण्यात ते शक्तीच्या रूपाने उपयुक्त ठरतील.
बंधू भगिनींनो, भ्रष्टाचाराने, काळ्या पैशाने देशाचे नुकसान केले. वाळवीप्रमाणे एक जागा बंद केली तर दुसरीकडून बाहेर येतात, दुसरी जागा स्वच्छ केली तर तिसऱ्या जागी येतात. मात्र तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढा सुरूच राहील. ज्यांनी गरीबांना लुटले आहे, त्यांना गरीबांना परत करावेच लागतील. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. एकामागोमाग एक पावले उचलतच राहीन. आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, तुम्ही मला जो आशिर्वाद देत आहात, तो प्रामाणिकपणाच्या लढाईसाठीचा आशिर्वाद आहे. नोटबंदीनंतर मला काही तरुणांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. शिकले-सवरलेले होते, श्रीमंत कुटुंबातील होते. मी विचार करत होतो कि नोटबंदीमुळे खूप वैतागलेले असतील, चिडलेले असतील, मात्र त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती खूप रोचक आहे. ते म्हणाले कि साहेब, आमच्या कुटुंबात रोज भांडणे होतात. मी म्हटले काय भांडणे होतात. म्हणाले, आम्ही वडिलांना सांगितले कि तुमच्या काळी जे सरकार होते, नियम होते, कर इतके अधिक होते, तुम्हाला चुकवेगिरी करावी लागलीच असेल. मात्र आता देशात इमानदारीचे युग आले आहे. आणि आमच्या पिढीतील लोक अप्रामाणिकपणे कारभार करू इच्छित नाहीत. आम्हाला प्रामाणिकपणे जगायचे आहे आणि प्रामाणिकपणे पुढे जायचे आहे. माझ्या देशातील तरुण पिढीमध्ये इमानदारीचे युग सुरु झाले आहे. इमानदारीने जगण्याची इच्छा निर्माण झाली आहे. हेच माझ्यासाठी शुभसंकेत आहेत, माझ्या बंधूनो, देशासाठी शुभ संकेत आहेत. जर देशातील युवकांनी एकदा का निर्धार केला कि माझ्या पूर्वजांना, माझ्या मातापित्यांना माझ्या मागच्या लोकांना जे काही करावे लागले, आता आम्हाला करायचे नाही. बंधुभगिनीनो, चोरी केल्याशिवाय, लूट केल्याशिवाय देखील सुख शांतीने आयुष्य जगता येते. समाधानाने झोपता येते. आणि म्हणूनच आम्हाला प्रामाणिकपणाच्या युगाच्या दिशेने देशाला घेऊन जायचे आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होणार आहेत. बंधुभगिनींनो, हि स्वातंत्र्याची ७५ वर्षे हा केवळ भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरचा विषय असू शकत नाही. हि स्वातंत्र्याची ७५ वर्षे, कॅलेंडरची एकापाठोपाठ एक तारीख बदलणे २०२२ येणे असा प्रवास नव्हे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणारे याच भूमीचे बिसरा मुंडा यांच्यापासून अगणित लोक होते. का त्यांनी स्वतःची बाजी लावली. त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते, आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, ते तर आपल्यासाठी फाशीवर चढले होते. त्यांनी आपल्यासाठी तुरुंगात आयुष्य काढले. त्यांनी आपल्यासाठी स्वतःची कुटुंबे उध्वस्त केली. आपण त्यांच्या स्वप्नांसाठी पाच वर्षे, मी जास्त सांगत नाहीये, मित्रांनो , पाच वर्षे २०२२ पर्यंत जे काही करू देशासाठी करू. काही ना काही करू, देशासाठी करू. आणि देशाच्या कल्याणासाठी करू. हे स्वप्न सव्वाशे देशबांधवांचे असायला हवे. सव्वाशे कोटी देशबांधवांचा एकेक संकल्प असायला हवा कि स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होण्यासाठी पाच वर्षे शिल्लक आहेत. पाच वर्षात मी समाजाला देशाला हे देऊनच राहीन. जर एका भारतीयाने एक संकल्प घेऊन एक पाऊल पुढे टाकले तर २०२२ येईपर्यंत भारत सव्वाशे कोटी पावले पुढे जाईल. मित्रांनो हे आपले सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच ही काळाची गरज आहे कि आपण आतापासून, सरकारमध्ये असलो तर सरकारमध्ये, विभागात बसलो असू तर विभागामध्ये, नगरपालिकेत बसलो असू तर नगरपालिकेत, नगरपंचायत असेल तर नगरपंचायत, शाळा असेल तर शाळेत, गाव असेल तर गावात गल्ली असेल तर गल्लीत, जातीमध्ये असेल तर जातीत, कुटुंबात असेल तर कुटुंबात काहींना काही संकल्प करा कि २०२२ पर्यंत इथपर्यंत पोहोचायचेच आहे. करूनच राहू. जर का एकदा प्रत्येक भारतीयाचे हे स्वप्न बनले तर २०२२ मध्ये स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या महापुरुषांना आपण असा भारत देऊ शकू कि त्यांना एकदा समाधान वाटेल कि आता माझा भारत देश योग्य दिशेने पुढे चालला आहे, ज्या देशासाठी मी आयुष्य वेचले, तो माझा देश पुढे चालला आहे, ते स्वप्न घेऊन पुढे जायचे आहे. या एका इच्छेसह मी पुन्हा एकदा झारखंडच्या भूमीला वंदन करतो. भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीला वंदन करतो. मी या पहाडी युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी झारखंडच्या जनतेला शुभेच्छा देतो. गंगामातेला नमस्कार करत हे जे आपण नवीन अभियान छेडले आहे, गंगामातेचे आशिर्वाद असेच राहूदे. या संपूर्ण परिसरात आपण एक नवीन आर्थिक क्रांती गंगामातेच्या विश्वासावर घडवून आणू , याच एका अपेक्षेसह तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार , खूप खूप शुभेच्छा.