PM's second interaction with Additional Secretaries and Joint Secretaries
भारत सरकारमध्ये कार्यरत असणा-या 80 पेक्षा जास्त अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिवांच्या समुहाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संवाद साधला. अशाप्रकारे पाच संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून या मालिकेतले हे दुसरे सत्र होते.
कामगिरीवर आधारित प्रशासन, नवीन सुशासन, कचरा व्यवस्थापन, नदी आणि पर्यावरण प्रदूषण, वने, स्वच्छता, हवामान बदल, कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास या विषयांवर पंतप्रधानांनी उपस्थित अधिका-यांसमवेत चर्चा केली. अनेकांची मते जाणून घेतली.
“अधिका-यांनी स्वतःला फक्त कामांच्या फाइलींपुरती मर्यादित ठेवू नये तर कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या त्या क्षेत्राला भेट दिली पाहिजे”. असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सनदी अधिका-यांशी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात बोलताना त्यांनी 2001 मध्ये गुजरातमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर पुर्ननिर्माणाच्या कामाचा अनुभव सांगितला.
अधिका-यांनी कामाकडे फक्त नोकरी, कर्तव्य या भावनेने पाहू नये, तर देशामध्ये शासनामार्फत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या भावनेने कार्यरत राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असा आग्रहही त्यांनी केला.
देशभरातील सर्वात जास्त मागासलेल्या 100 जिल्हयांची सूची तयार करावी आणि त्या जिल्हयांमध्ये विकासकामे करून त्यांना देशाच्या इतर जिल्हयांच्या बरोबर आणावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
देशभरातील सर्वात जास्त मागासलेल्या 100 जिल्हयांची सूची तयार करावी आणि त्या जिल्हयांमध्ये विकासकामे करून त्यांना देशाच्या इतर जिल्हयांच्या बरोबर आणावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.