18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी संवाद साधला.
पंतप्रधानांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या अनुकरणीय कामगिरीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या पदक विजेत्यांनी आपल्या खेळामुळे भारताचा सन्मान आणि प्रतिष्ठा उंचावली आहे, असे ते म्हणाले. पदक विजेत्या खेळाडूंचे पाय यापुढेही जमिनीवर राहतील आणि प्रसिद्धी तसेच कौतुकाच्या भडीमारात खेळाकडे त्यांचे दुर्लक्ष होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी या संवादादरम्यान केले. खेळाडूंनी तंत्रज्ञानाचा वापर करत स्वत:चे कठोर मूल्यमापन करत सुधारणा करत राहिले पाहिजे तसेच स्वत:बरोबरच जगातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
छोटी शहरे, ग्रामीण भाग आणि गरीब परिस्थितीतील युवा खेळाडू पुढे येऊन देशासाठी पदके प्राप्त करत आहेत, हे पाहून पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता दडलेली असून आपण त्या गुणवत्तेची जोपासना केली पाहिजे, असे ते म्हणाले. एका खेळाडूला रोजच्या आयुष्यात किती संघर्षांना सामोरे जावे लागते, याची कल्पना बाहेरच्या विश्वाला नसते, असेही पंतप्रधान म्हणाले.
हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून देशासाठी पदके प्राप्त करणाऱ्या काही खेळाडूंच्या नावांचा उल्लेख करताना पंतप्रधान भावूक झाले. खेळाप्रती त्यांचे समर्पण आणि हिमतीला पंतप्रधानांनी अभिवादन केले. त्यांच्या उदाहरणातून अवघा देश प्रेरणा घेईल, असे पंतप्रधान म्हणाले.
आता प्राप्त केलेल्या यशानंतर खेळाडूंनी स्वस्थ बसू नये आणि यापेक्षा मोठे यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले. या पदक विजेत्यांनी नव्याने सुरुवात करणे, हेच मोठे आव्हान असल्याचे सांगत ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील रहावे, असे ते म्हणाले.
युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांचा दृष्टीकोन आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांमुळे युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आणि पदकतालिकेत भारताच्या स्थानात सुधारणा झाली, असे ते म्हणाले.
इंडोनेशियामध्ये जकार्ता आणि पलेम्बँग येथे नुकत्याच झालेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तब्बल 69 पदक पटकावली आहेत. यापूर्वी 2010 साली ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 65 पदकांची कमाई केली होती.