तत्पर प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी यासाठीच्या “प्रगती” या बहुआयामी मंचाची 29 वी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित तक्रारींच्या निराकरणाच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. तंत्रज्ञान विषयक आणि या संदर्भातही केलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित तक्रारी आणि समस्यांचे निराकरण, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असावे असे पंतप्रधान म्हणाले. सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना संपूर्णत: समाधान देणारी सेवा पुरवावी यावर पंतप्रधानांनी भर दिला.
प्रगतीच्या 28 व्या बैठकीत 11.75 लाख कोटी रुपये एकूण गुंतवणुकीच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातल्या जन तक्रारींवरच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
आजच्या बैठकीत, पंतप्रधानांनी रेल्वे, नागरी विकास, रस्ते ऊर्जा, कोळसा क्षेत्रातल्या आठ महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगाल यासह इतर राज्यात या प्रकल्पांची व्याप्ती आहे.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. खनिज साठे असलेल्या जिल्ह्यांसाठी आता पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत याची दखल घेऊन या जिल्ह्यातल्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या निधीचा वापर करण्यावर, केंद्र आणि राज्य स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी कटाक्ष ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याची ही संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.