पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीद्वारे 24व्या चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. प्रो-ॲक्टिव्ह गव्हर्नन्स आणि टाईम्ली इम्प्लिमेंटेशन (प्रगती)साठी आयसीटी आधारीत हा बहुविध मंच आहे.
यापूर्वी झालेल्या प्रगतीच्या 23 बैठकांमध्ये एकूण 9.46 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या 208 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला होता. 17 क्षेत्रांमधील जनतेच्या तक्रारींच्या निपटाऱ्याचाही आढावा घेण्यात आला.
आज 24व्या बैठकीत, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथ पुनर्निर्माण कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य सरकारने ड्रोन छायाचित्रांच्या माध्यमातून कामाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. पंतप्रधानांनी दिल्ली पोलिसांशी संबंधित तक्रारींचा निपटारा आणि अन्य कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी तक्रारी निवारण प्रक्रिया सुधारण्याच्या महत्वावर भर दिला.
पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते, ऊर्जा, पेट्रोलियम आणि कोळसा क्षेत्रातील 10 पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळसह विविध राज्यांमध्ये हे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांचा खर्च 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला.