पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या मंत्रालयातील सर्वोच्च अधिकारी असणाऱ्या सर्व सचिवांची अनौपचारिक भेट घेतली.
जुन्या काळातील प्रशासकीय यंत्रणेच्या कक्षेतून बाहेर पडण्याचे आवाहन करत सचिवांना मानवतेच्या दृष्टीने नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीला 2022 साली 75 वर्षे पूर्ण होत आहे, तोपर्यंत कोणती निश्चित ध्येये साध्य करायची, हे वेळीच ओळखा असे पंतप्रधान म्हणाले.
आपापल्या विभागाच्या कक्षेबाहेर आपापल्या मंत्रालयाच्या कक्षेबाहेर विचार करुन देशाच्या विकासासाठी सचिवांनी कार्यरत राहावे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. सर्व शासकीय यंत्रणा जेव्हा संघभावनेने एखादे काम हाती घेते तेव्हा ते उत्तम प्रकारे पूर्ण होते हे गेल्या तीन वर्षात जन धन योजना आणि मिशन इंद्रधनुष अशा योजनांच्या उदाहरणातून समोर आले आहे, असे ते म्हणाले. संस्थांना ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने सक्षम केले पाहिजे असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
स्वच्छ अभियानासंदर्भात बोलतांना या मोहिमेला तळागाळातील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही बदल करणे भाग पडत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
येत्या 1 जुलैपासून देशभरात राबविली जाणारी वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही देशाच्या इतिहासाला वळण देणारी घटना आहे, असे सांगत या कर प्रणालीच्या सुलभ अंमलबजावणीसाठी सचिवांनी सकारात्मक पूर्वतयारी करावी असे आवाहन त्यांनी केले.
जग आता भारताकडे वेगळया नजरेने पाहत असल्याचे सांगत ही अमूल्य संधी आपण दवडू नये, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. जागतिक अपेक्षांना जागतिक अपेक्षा पूर्ण करणारी यंत्रणा आपण उभारु असे आवाहन त्यांनी सचिवांना केले.
भारतातील आणखी 100 मागास जिल्हयांचा विकास करण्याची मोहिम सुरु करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या जिल्हयांसाठी ठराविक लघु मुदतीत विशिष्ट मानकांच्या आधारे साध्य करण्याची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांनीही सचिवांना संबोधित केले.
तत्पूर्वी विविध सरकारी विभागांसंदर्भात सचिवांनी आपल्या सुधारणा सादर केल्या.