मी आज, पोलंड आणि युक्रेन या देशांच्या अधिकृत भेटींसाठी रवाना होत आहे.
भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे.
पोलंड भेटीनंतर मी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या आमंत्रणाला मान देऊन युक्रेनला भेट देईन. भारतीय पंतप्रधानांची आतापर्यंतची ही पहिलीच युक्रेन भेट आहे. भारत आणि युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी आधी संवाद साधण्याच्या दृष्टीने तसेच सध्या सुरु असलेल्या युक्रेन विवादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दृष्टीने माझे विचार सामायिक करण्याबाबत मी उत्सुक आहे. एक मित्र तसेच एक भागीदार म्हणून आम्हाला या भागात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्याची आशा आहे.
हा दौरा दोन्ही देशांतील व्यापक संपर्काची नैसर्गिक सातत्यता राखण्याचा मार्ग म्हणून काम करेल आणि येत्या काळात अधिक मजबूत आणि अधिक चैतन्यपूर्ण संबंधांचा पाया निर्माण करण्यात मदत करेल असा विश्वास मला वाटतो.