अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बंधू-भगिनी,
परिवारातल्या सदस्यांना भेटल्यावर जो आनंद होतो,तसा आनंद मला आपणा सर्वांना भेटल्यावर होतो, एक नवी ऊर्जा देऊन जातो. तुम्ही मला नवा उत्साह देता.आज पुन्हा ही संधी मला मिळाली आहे.
गेल्या वीस वर्षात मी अनेक वेळा अमेरिकेत आलो. मी मुख्यमंत्री नव्हतो,पंतप्रधान नव्हतो,तेव्हा अमेरिकेच्या जवळ-जवळ 30 राज्यात मी भ्रमण केले आहे आणि प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने, इथे वसलेल्या आपणा सर्व परिवारांना भेटण्याची संधी मला लाभली.
पंतप्रधान झाल्यानंतर तर आपणा सर्वानी इतके मोठे-मोठे समारंभ आयोजित केले त्याच्या आठवणी जगभरात आजही रेंगाळत आहेत . केवळ अमेरिकी नेते नव्हे तर जगभरातल्या राजकीय नेत्यांशी भेट होते, तेव्हा त्यांच्या मनात, माझी ओळख,अमेरिकेतल्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरु होते.
ही आपणा सर्वांची कमाल आहे.अमेरिकेत राहून असे कार्यक्रम आयोजित करायला किती मेहनत घ्यावी लागते,किती गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते आणि एवढे असूनही आपण हा कार्यक्रम यशस्वी करता.
या दौऱ्यात मी बऱ्याच लोकांना नाराज करणार आहे, कारण अनेक कार्यक्रमांचे प्रस्ताव येत होते, मोठा कार्यक्रम करण्याची तुम्हा लोकांचीही इच्छा होती मात्र मी सांगितले की, मोठा कार्यक्रम नक्की करेन पण मागच्यावेळच्या माझ्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोठे कष्ट घेतले, मेहनत घेतली त्यांना मला भेटायचे आहे.
वेळ दिला,पैसे खर्च केले, आपल्या वैयक्तिक कार्यक्रमात फेरबदल केले,तर या वेळी मला वाटले की, ज्यांनी परिश्रम घेतले त्या, आपणा सर्वांची भेट घ्यावी आणि आज मला ही संधी मिळाली.एका प्रकारे मी इथे जे रूप पाहतो आहे त्यात लघु भारत आहे आणि लघु अमेरिकाही आहे.
भारतातल्या, जवळ-जवळ सर्वच राज्यातले लोक इथे आहेत आणि अमेरिकेतल्याही सर्वच राज्यातले लोक इथे आहेत. आपण सर्व कुठे राहता, कसे राहता,कोणते काम करता,कोणत्या परिस्थितीत देश सोडून इथे आलात,यापैकी काहीही असो, हिंदुस्तानमध्ये काही चांगली गोष्ट घडली तर आपणा सर्वांच्या आनंदाला पारावार राहत नाही.हिंदुस्तानमध्ये काही अप्रिय गोष्ट घडली तर तुम्हालाही चैन पडत नाही.याचे कारण म्हणजे माझा देश पुढे कसा जाईल,असा विचार आपल्या मनात सदैव वसत असतो.
आपण जी स्वप्ने पाहिलीत,ती पूर्ण होताना आपण नक्कीच पाहाल याची खात्री मी देतो. तुम्ही हिंदुस्तानमध्ये होता आणि आता तुम्ही अमेरिकेत आहात, मात्र आपली शक्ती, आपले सामर्थ्य,त्याला अनुकूल वातावरण मिळताच आपण इतकी भरभराट केली की अमेरिकेच्या भरभराटीसाठीही आपण मोठे सहाय्यक ठरलात.
भारतीयांची तीच शक्ती,अमेरिकेत अनुकूल वातावरण मिळाल्यावर, अमेरिकेच्या भल्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या हितासाठीही कार्यरत राहिली,दोघांचीही विकास यात्रा बरोबरीने सुरु राहिली.आपणाप्रमाणेच, आपणासारखेच सामर्थ्य बाळगणारे, आपणासारखीच प्रतिभा लाभलेले, सव्वाशे कोटी हिंदुस्थानी,हिंदुस्तानात वसत आहेत.
आपणा सर्वाना जशी अनुकूल परिस्थिती मिळाली आणि परिस्थिती पालटली,त्यांनाही अनुकूल परिस्थिती मिळत आहे तर सव्वाशे कोटी देशवासीय किती झपाट्याने हिंदुस्थान बदलतील याचा आपण आणि मी नक्कीच अंदाज लावू शकतो.
आज भारतात सर्वात मोठे परिवर्तन घडत आहे आणि मला ज्याचा क्षणो-क्षणी अनुभव येत आहे, प्रत्येक देशवासियाला काहीतरी करायची इच्छा आहे,प्रत्येक जण काही ना काही करत आहेआणि तेही माझा देश अग्रेसर रहावा, हे स्वप्न, हा संकल्प घेऊन करत आहे.सव्वाशे कोटी देशवासियांचा काही करण्याचा निर्धार, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत,अटक ते कटक, संपूर्ण देशात अनुभवायला मिळतो तेव्हा मी आपणा सर्वाना खात्री देतो की मागच्या अनेक वर्षात जी गती नव्हती ती गती घेऊन देश आज पुढे जात आहे. भारतात ज्या मुद्द्यांवर सरकारे बदनाम होत राहिली आणि बदलत राहिली याचे कारण एखाद्या व्यक्तीला काही हवे होते आणि त्याला ते मिळाले नाही असे यामागचे मोठे कारण नव्हते,असंतोष हे मोठे कारण नव्हते.जसे आपण आहात, संतोष बाळगण्याचे परंपरागत संस्कार आहेत.ठीक आहे,असू दे. तरुण मुलाचा, आजारपणामुळे मृत्यू झाला तर आई-वडील म्हणतात, ईश्वराची इच्छा होती, म्हणून देवाघरी गेला.आपली ही मूलभूत विचारसरणी आहे.
भारतात सरकारे बदलली गेली त्याच्या मुळाशी कारण आहे ते म्हणजे भ्रष्टाचार,बेइमानी. आज मी विनम्रतेने सांगू इच्छितो की या सरकारच्या आतापर्यंतच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात या सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एकही डाग लागलेला नाही.सरकार चालवण्याच्या पद्धतीत एक अशी व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न होत आहे,ज्यात इमानदारी एक सहज प्रक्रिया असेल.वारंवार नजर ठेवल्यावरच या गोष्टी राखल्या जातील असे असता कामा नये तर ती सहज प्रक्रिया हवी.
तंत्रज्ञानाची यात मोठी भूमिका आहे.तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता येते, नेतृत्व आणि प्रशासनाच्या नियमांमुळे सचोटी येते आणि सामान्य माणसाचा स्वभाव चांगला असेल तर तो या मार्गाने वाटचाल करणे जास्त पसंत करतो.
सामान्य माणसाला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदान आणि मदतीचे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून , थेट लाभ हस्तांतरण योजनेत रूपांतर केले. याचा परिणाम काय झाला तर आपल्या घरात गॅस सिलेंडर येतो, आपल्या भारतासारख्या देशात,लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्याची गरज आहे, जितका आर्थिक बोजा कमी होईल त्यातून या पैशाचा वापर शिक्षणासाठी करता येईल,आरोग्यासाठी करता येईल,मुलांसाठी करता येईल,यासाठी अनुदान दिले जाते, गरिबांवर विशेष लक्ष पुरवले जाते.गॅसवर अनुदान दिले जाते ते गरिबातल्या गरिबाला जाते आणि श्रीमंतातल्या श्रीमंतालाही जाते आणि कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या व्यक्तीलाही अनुदानवाला सिलेंडर मिळतो.
मी लोकांना विनंती केली आणि सांगितले की ईश्वराने तुम्हाला सर्व काही दिले आहे तर हे अनुदान कशाला घेता, या 1000 -1500 रुपयांत काय आहे?तुमचा रोजचा हातखर्च यापेक्षा जास्त असेल.देशाच्या सामान्य नागरिकाला देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्याची मोठी इच्छा आहे.या माझ्या म्हणण्याला उदाहरणांची जोड काय आहे?याचे उदाहण असे आहे की सव्वा कोटी देशवासीय म्हणजेच सव्वा कोटी कुटुंब,म्हणजेच 25 कोटी कुटुंबांनी सांगितले की मोदीजी आपण सांगितले आहे म्हणून आम्ही आजपासून अनुदान घेणार नाही.
सामान्य माणसाला देशाच्या विकासात स्वतःचाही वाटा उचलायचा आहे, त्याला काही करायचे आहे, नेतृत्व करायचे आहे, हेच यावरून स्पष्ट होते. या स्वेच्छेने त्याग केलेल्या अनुदानाची आम्ही केवळ सरकारी खजिन्यात भर नाही घातली. हे अनुदान अशा गरीब कुटुंबाना आम्ही देत आहोत, जे चुलीवर स्वयंपाक करतात, मेहेनत मजुरी करतात,मुलांसाठी,पहाटे 3-4 वाजता उठून लाकडे आणतात,चूल पेटवतात
लाकडे पेटवून चुलीवर स्वयंपाक केल्याने जो धूर निर्माण होतो, आई जेव्हा दिवसभर स्वयंपाकघरात राहून चुलीवर जेवण करते, तेव्हा 400 सिगारेटच्या धुराइतका धूर तिच्या शरीरात जातो असे वैज्ञानिक सांगतात.लहान लहान मुले घरात खेळात असतात, त्यांच्या शरीरातही हा धूर जातो.आता तुम्ही कल्पना करू शकता की, एका दिवसात 400 सिगारेटच्या धुराइतका धूर आईच्या शरीरात जातो त्यावेळी काय हाल होत असतील,त्या मुलांच्या शरीराचे काय हाल असतील याची कल्पना तुम्ही करा
निरोगी भारताचे स्वप्न मी पाहत असेन तर निरोगी आई, तसेच मुले आरोग्यदायी हवीत.सव्वा कोटी लोकांनी गॅस अनुदानाचा स्वेच्छेने त्याग केला, ते सिलेंडर आम्ही गरीब कुटुंबाना देऊ,आणि हे अनुदान गरीबांकडे सोपवू. एवढेच नव्हे तर ज्यांनी अनुदान स्वेच्छेने त्यागले त्यांना माहितीही पुरवली की गुजरातमधल्या या गावात आपण अनुदानाचा स्वेच्छेने त्याग केलात,आता आसाममधल्या अमुक अमुक गावात,अमुक अमुक जिल्ह्यात या गावातल्या गरिबाला हे अनुदान पाठवण्यात आले आहे.
मेहनत पडली तरी या पारदर्शकतेमुळे एक नवा विश्वास निर्माण होतो. हिंदुस्तानमध्ये आपण पाहिले असेल स्वयंपाकाचा सिलेंडर मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागायची,नेत्यांच्या घरी फेऱ्या माराव्या लागायच्या. येत्या तीन वर्षात 5कोटी गरीब कुटुंबाना स्वयंपाकाची गॅस जोडणी देऊन त्यांना लाकडाचा वापर लागणाऱ्या चुलीपासून सुटका द्यायची आहे.या योजनेला आतापर्यंत 11 - 12 महिनेच झाले असतील आणि आतापर्यंत सुमारे एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबाना स्वयंपाकाचा सिलेंडर पुरवला आहे.
अनुदान देण्यात येत होतेच,मात्र आम्ही त्यात बदल केला.याआधी, जो विक्री करत असे त्याला अनुदान मिळत असे त्या ऐवजी ज्याच्या घरी सिलेंडर जातो त्याच्या बँक खात्यात अनुदान आम्ही जमा करतो.सुरवातीला आमच्यावर आरोप केला गेला की मोदी,देशातल्या लोकांची मोठ्या प्रमाणात खाती उघडण्यामागे आहेत.मी अभियान सुरु केल्यापासून 6 महिन्याच्या आत देशात सर्वत्र बँक खाती उघडण्यात येऊ लागली, 40 टक्के लोक होते, ज्यांचे बँकेत खाते नव्हते ,बँकेशी त्यांचा संबंध नव्हता. आम्ही खाती उघडली, तर आरोप करण्यात आला की खाती उघडली मात्र त्यात पैसे नाहीत.
आरोप करण्यासाठी निमित्त हवे असते,आम्ही थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु केली आणि सरकारी अनुदान थेट बँक खात्यात जमा व्हायला लागले.आपल्याला आश्चर्य वाटेल की 3 कोटी अनुदान असे होते की ज्याचा कोणी मालकच नव्हता.असे किती हजार कोटी वर्षाला जात असतील, कोणाच्या खिशात जात असतील माहित नाही.थेट लाभ हस्तांतरणामुळे हे 3 कोटी बनावट नावाखाली जात होते ते थांबले.पैसे वाचले आणि आता ते पैसे गावात शाळा उभारण्यासाठी उपयोगी येत आहेत. पारदर्शकता आणण्यात तंत्रज्ञान मोठी भूमिका निभावत आहे. तंत्रज्ञानाची ताकत काय आहे,हे युवा पिढी,नक्कीच ओळखून आहे. आज हिंदुस्थान या तंत्रज्ञानावर भर देत व्यवस्था विकसित करत आहे.
मी पंतप्रधान पदावर आल्यानंतर सगळ्या मुख्यमंत्र्यांकडून पत्रे यायला लागली, पहिल्या महिन्यात अशीच सारी पत्रे आली.आपल्याला ऐकून आनंद होईल की गेल्या दोन वर्षात मला एकाही मुख्यमंत्र्यांकडून युरियासाठी एकही पत्र आले नाही. कुठेही युरियाचा तुटवडा नाही,युरियासाठी रांगा नाहीत, नाहीतर आपल्या देशात युरियासाठी लोक रात्र-रात्र रांगेत उभे राहायचे.सकाळी दुकान उघडल्यावर युरिया मिळावा यासाठी उघड्यावरच झोपत.
आम्ही रातोरात युरियाचे कारखाने उघडले का, तर नाही.रातोरात युरियाचे उत्पादन वाढवले का , तर नाही. एक सोपे काम केले,युरियाला कडुनिंबाचा लेप दिला,कडुनिंबाचे तेल. पहिल्यांदा काय व्हायचे, युरिया तयार होत असे,शेतकऱ्यांना युरियात मोठे अनुदान मिळायचे वार्षिक सुमारे 80000 कोटी रुपये अनुदानात जायचे.कारखान्यातून युरिया स्वस्तात तयार होतो मात्र तो शेतात जात नसे तर रासायनिक कारखान्यात जात असे.रासायनिक कारखान्यासाठी तो कच्चा माल असायचा, त्यावर प्रक्रिया करून वेगळे उत्पादन घेऊन तो माल जगभरात विकून पैसे मिळवले जायचे.कडुनिबांचे लेपन केल्यानंतर एक ग्राम यूरियाही दुसऱ्या कोणत्या कामासाठी वापरता येत नाही. युरिया रासायनिक कारखान्यात जाणे बंद झाले त्यामुळे तो शेतीसाठी उपयोगात येऊ लागला आणि कडुनिबांच्या लेपनामुळे युरियाची ताकत वाढली त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला.याचा परिणाम म्हणून कृषी उत्पादनात 5टक्क्यावरून 7 टक्क्यापर्यंत वाढ झाली.युरियाची चोरी कमी झाली त्यामुळे अनुदानावरचा खर्च कमी झाला. सगळा युरिया शेतापर्यंत जायला लागल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण नाहीशी झाली आणि कडुनिबांच्या लेपनामुळे उत्पादनही वाढले ते केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने.
मी अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत सध्या नवी कामगिरी करत आहे.अंतराळ क्षेत्रात भारत नावारूपाला आला आहे.दोन दिवसांपूर्वीच 31 लघु उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात आले.मागच्या महिन्यात आपण एकाच वेळी 104उपग्रह अंतराळात सोडून जागतिक विक्रम केला.जगाला आश्चर्य वाटले की भारत एकाच वेळी 104उपग्रह अंतराळात सोडत आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानने एक उपग्रह प्रक्षेपित केला ज्याच्या वजनाची तुलना किलोग्रॅम मध्ये नव्हे तर हत्तींच्या वजनाइतका उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हत्तींच्या वजनाशी आपल्या उपग्रहाची तुलना होत आहे. आधुनिक भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी,तंत्रज्ञानाधारित प्रशासन, तंत्रज्ञानाधारित समाज, तंत्रज्ञानाधारित विकासावर नव्याने भर देण्यात येत आहे आणि त्याचा जलदगतीने होणारा सुखद परिणामही दिसू लागला आहे.
आपल्या देशात कामे होत नव्हती असे नाही, कामे होत असत, काही करण्यासाठी सरकारे बनतात.आपला कार्यकाळ खराब करावा आणि निवडणुकीत पराभव व्हावा असे कोणत्याच सरकारला वाटत नाही.मात्र देशाच्या गरजा, अपेक्षेनुसार वेगाने आणि योग्य दिशेने परिणामकारक काम होणे यात फरक असतो.म्हणूनच निर्णय कालबद्ध, वेगवान,योग्य दिशेने आणि परिणामकारक असावा हे मापदंड लावून देशाकडे पाहायला हवे.
पहिल्यांदा एका दिवसात किती लांबीचा रस्ता तयार होत असे आणि आता किती लांबीचा बनतो,याआधी किती लांबीचा रेल्वे मार्ग तयार होत असे आणि आता किती लांबीचा तयार होतो,यापूर्वी एका दिवसात रेल्वेचे किती विदयुतीकरण होत असे आणि आता किती होते,कोणताही मापदंड घ्या, आज देशाच्या कामात गती आली आहे कारण शाश्वत विकासासाठी,पायाभूत सुविधा आवश्यक असतात. पायाभूत सुविधांमध्येही आमचे विचार आधुनिक भारताच्या संदर्भात आहेत, 21 व्या शतकाच्या संदर्भात आहेत.
आता काम करायचे म्हणून करायचे असे चालणार नाही.एक काळ असा होता जेव्हा दुष्काळ पडत असे तेव्हा गावातले लोक सरकारला कळवायचे आणि सांगायचे की आमच्या गावात दुष्काळी काम म्हणून मातीचे खड्डे खोदण्याचे काम काढा म्हणून त्यानंतर त्या मातीचे रस्ते बनवले जायचे.यालाच सरकारची कामगिरी मानली जायचे त्या काळात.
हळू-हळू लोक म्हणू लागले साहेब रस्ता तयार करा,डांबरी रस्ता करा,त्यानंतर हळू-हळू लोक म्हणू लागले साहेब दुहेरी रस्ता करा, आज मागणी होते आहे की द्रुतगती मार्ग हवा त्यापेक्षा कमी नको. देशातल्या, लोकांच्या या अपेक्षा वाढत आहेत,ही भारताच्या विकासाची सर्वात मोठी ताकत आहे.जेव्हा देशाच्या सामान्य माणसाच्या आकांक्षा वाढत जातात,त्यांना योग्य नेतृत्व मिळाले, योग्य प्रशासन मिळाले, धोरण मिळाले,तर ती आपोआप एक मोठी कामगिरी बनते.
जनता-जनार्दनाच्या आकांक्षांना कामगिरीमध्ये रूपांतर होण्याच्या दिशेने आम्ही धोरणे निश्चित करतो, आम्ही गती निश्चित करतो,प्राधान्यक्रम निश्चित करतो आणि सर्व शक्तीनिशी काम करू लागतो त्यामुळे अपेक्षित परिणाम येतात.
आज संपूर्ण जगाला दहशतवादाच्या प्रश्नाने ग्रासले आहे.हा दहशतवाद मानवजातीचा शत्रू आहे. 20 -25 वर्षांपूर्वी भारत जेव्हा दहशतवादाबाबत बोलत होता तेव्हा जगाला पटत नव्हते. जगातल्या लोकांना वाटत होते की हा भारताच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे,कारण दहशतवादी कृत्यांचा अनुभव त्यांना आला नव्हता.आज जगात कोणाला दहशतवाद समजावून सांगायला लागत नाही, दहशतवाद्यांनी तो समजावून दिला आहे.आम्ही समजावून सांगत होतो तेव्हा समजत नव्हता आता दहशतवाद्यांनी तो समजावून दिला आहे.जेव्हा भारत सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्षभेदी कारवाई करतो तेव्हा जगाला सामर्थ्याचे दर्शन घडते, भारत संयम बाळगतो, मात्र गरज भासली तर आपले सामर्थ्य दाखवूनही देऊ शकतो.
जगाच्या कायद्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत, कारण आमचे ते संस्कार आहेत.वसुधैव कुटुम्बकम संकल्पना मानणारे आहोत, हे केवळ शब्द नाहीत तर हा आमचा स्वभावधर्म आहे,चरित्र आहे.जागतिक घडी विस्कटून त्याची वाताहत करून वरचढ होणारा हा देश नाही,जगाच्या नियमांचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत, आमच्या सार्वभौमत्वासाठी,आमच्या रक्षणासाठी, आमच्या जनतेसाठी,सुख- शांती आणि प्रगतीसाठी,जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा कठोर पाऊले उचलण्याचे सामर्थ्य आम्ही बाळगतो आणि जग आम्हाला कधीही रोखू शकत नाही.
सर्जिकल स्ट्राईक एक अशी घटना होती,जर जगाला वाटले असते तर जगाने बोल लावले असते, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असते, जबाब मागितला असता,जगभरात टीकेला तोंड द्यावे लागले असते,मात्र आपण पहिल्यादांच अनुभव घेतला असेल, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, एवढे मोठे पाऊल उचलल्यानंतर जगभरात कोणी प्रश्न उपस्थित केला नाही.ज्यांनी हे भोगले आहे त्यांची बाब वेगळी आहे, म्हणूनच दहशतवादाचे रूप, भारतीय नागरिकांचे जीवन उध्वस्त करत आहे हे जगाला समजावून सांगण्यात आपण यशस्वी ठरलो.
एकविसाव्या शतकातला हिंदुस्थान घडवण्यासाठी देश आर्थिक क्षेत्रात आगेकूच करत आहे.केवळ पैशामुळेच देश विकास साधतो असे नव्हे, त्याची सर्वात मोठी ताकत असते ती मनुष्य बळ,त्यापेक्षा मोठी ताकत असते ती म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती.ज्या देशाकडे 35 वर्षापेक्षा कमी वयाची 800 दशलक्ष युवाशक्ती आहे, जो देश तरुण आहे,त्या देशाची स्वप्नेही तरुण असतात,त्याचे सामर्थ्य सळसळते असते त्याच्या साथीने आम्ही धोरणाच्या दिशेने पुढे राहत आहोत,थेट परकीय गुंतवणुकीच्या दिशेने.स्वातंत्र्यानंतर भारतात थेट परकीय गुंतवणूक आली असेल त्यापेक्षा अनेक पटीने आज भारतात थेट परकीय गुंतवणूक येत आहे.
जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधीसारख्या पत मानांकन संस्था, भारताकडे एक चमचमता तारा म्हणून आहेत.प्रत्येकाने भारताच्या सामर्थ्याचा स्वीकार केला आहे.भारत हा गुंतवणूक स्थानातील उच्च स्थानी असलेला देश म्हणून जग, भारताकडे पाहत आहे.मात्र नावीन्य,तंत्रज्ञान,प्रतिभा यांचेही सामर्थ्य आहे.
जगभरात असलेल्या भारतीय समुदायाकडे हे सामर्थ्य आहे,त्याला वावही मिळाला आहे त्यांनी जीवनात काही साध्य केले आहे.भारताचे हे बुद्धी धन,भारताचे हे अनुभव धन जे संपुर्ण जगभरात पसरले आहे, त्यांना मी आमंत्रित करतो,आपल्याजवळ जे सामर्थ्य आहे, जो अनुभव आहे तो हिंदुस्तानसाठी उपयोगी ठरेल, ज्या देशाने आपल्याला नावलौकिक दिला त्या मातीचे ऋण फेडावे असे आपल्याला वाटत असेल तर यापेक्षा उत्तम संधी कधी येणार नाही.
अमेरिकेत जगभरातल्या सर्व समाजाचे, जगातल्या प्रत्येक देशाचे लोक इथे राहतात,मात्र इथे राहणाऱ्या हिंदुस्तानच्या लोकांना जितका आदर आणि सन्मान मिळतो, जेवढा स्नेह मला मिळाला आहे तेवढा स्नेह जगभरातल्या इतर नेत्यांना कदाचितच मिळत असेल.कधी कधी वाटते,या पिढीनंतर काय ? या पिढीमध्ये जी भावना आहे, ती येणाऱ्या पिढीतही राहील का,म्हणूनच भारताबरोबर आपला धागा कायम राखणे आवश्यक आहे.
आपली नवी पिढी भारताबरोबर जोडलेली राहावी यासाठी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. ज्या-ज्या राज्यातून आपण येता त्या प्रत्येक राज्याने आपल्या इथे प्रवासी भारतीयांसाठी खाते निर्माण केले आहे.भारत सरकारनेही दिल्लीमध्ये उत्तम प्रवासी भारतीय भवन तयार केले आहे.आपणही भारतात याल तेव्हा जरूर ते पहा, तिथे राहण्याची व्यवस्था आहे, सर्व सुविधा आपल्यासाठीच आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणजे कोट-पॅन्ट-टाय घालणे, मोठ्या -मोठ्या व्यक्तींबरोबर हस्तांदोलन करणे, जगभर प्रवास करणे, असेच चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर होते. तीन वर्षात आपण पाहिले असेल की भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून नवे शिखर गाठले आहे.जगातल्या कोणत्याही देशात, संकटात सापडलेल्या 80000 पेक्षा जास्त हिंदुस्थानी व्यक्तींची ,भारत सरकारने सहीसलामत सुटका केली.80000 हा आकडा लहान नव्हे.
यापूर्वी, कोणत्याही देशात सुखासमाधानात राहत होतात,मात्र गेल्या 20 वर्षात जो बदल घडला आहे,परदेशात राहणाऱ्या भारतीयाला वाटते काही होणार तर नाही?मात्र मागची तीन वर्षे त्याला समाधान आहे की काही झाले तरी आमचा दूतावास आहे.आपण आत्ता पाहिले असेल भारतातली एक मुलगी मलेशियामध्ये गेली, कोणाच्या ओळखीने पाकिस्तानला गेली.स्वप्ने घेऊन गेली होती मात्र तिथे तिच्या आयुष्याचे नुकसान झाले. मुस्लिम मुलगी होती,तिला वाटले पाकिस्तानमध्ये गेल्यावर आयुष्य सुखासमाधानात जाईल.फसल्या गेल्याचे लक्षात आल्यावर तिने विचार केला की संधी मिळताच, पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासात गेले तर सुरक्षित होईन .ती भारतीय दूतावासात पोहोचली आणि आता भारतात परतली आहे. सुषमाजींनी स्वतः त्या मुलीची भेट घेतली. मी याआधी इथे येत असे तेव्हा , परदेशात राहणाऱ्या आपल्या बांधवांकडून ऐकत असे, विमानतळावर उतरताच टॅक्सिवाला, उतरताच कस्टमवाला, सगळीकडे अस्वच्छता,असेच ऐकायला मिळत असे.माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की आता परदेशातून जेवढी पत्रे येतात त्यामध्ये जास्ती करून पत्रे ही त्या देशातल्या आपल्या दूतावासात जो बदल दिसत आहे,तिथले वातावरण या लोकांप्रती स्नेहपूर्ण झाले आहे,याची प्रशंसा करणारी पत्रे असतात.आम्ही धोरणात मोठे बदल केले आहेत.आपण सर्वाना माहित आहे, आपण पारपत्र घेतले तेव्हा किती प्रयत्न करावे लागले.आता प्रत्येक टपाल कार्यालयात पारपत्रासाठी केंद्रे उघडली जात आहेत, जे पारपत्र मिळवायला 6-6 महिने लागायचे ते आता15 दिवसात मिळू लागले आहे.
सोशल मीडियाची ताकत मोठी आहे.मी पण सोशल मीडियाशी जोडलेला आहे.आपणही नरेंद्र मोदी अँप पाहत असाल, पाहत नसाल तर डाउनलोड करून घ्या. सोशल मीडियाद्वारे एखाद्या खात्याची ताकद कशी वाढते हे उत्तम प्रकारे करून दाखवले आहे आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणि आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी.
भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने दाखल घेतली आहे की,केवळ कोट-पॅन्ट-टाय व्यक्तींपुरतेच मर्यादित असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आता गरिबातल्या गरीब व्यक्तीशीही जोडले गेले आहे आणि देशात हे पहिल्यांदाच घडले आहे.रात्री दोन वाजताही, एखाद्या पीडित व्यक्तीने, जगातल्या कोणत्याही देशातून ट्विट केले तर15 मिनिटात सुषमाजी यांचे ट्विटरवर उत्तर जाते, 24 तासात सरकार त्यावर कार्यवाही करते आणि पाठपुरावा करून निराकरण करते.हे आहे उत्तम प्रशासन, हे आहे जन स्नेही प्रशासन.
मित्रहो, आपणा सर्वानी जी जबाबदारी सोपवली आहे ती पार पाडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.तीन वर्षे उत्तम राहिली आणि येणारा प्रत्येक क्षण, देशाला नव्या यशोशिखरावर नेण्यासाठी खर्च करू.आपली सोबत आणि सहकार्य मिळाले आहे.आपण एव्हढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.यानंतर फोटो सेशन अर्थात फोटो काढण्याचे सत्र होणार आहे असे मला सांगितले आहे, त्यासाठी मी आपणा सर्वामध्ये पुन्हा सहभागी होईन, तोपर्यंत आपण तयार राहा.मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.