पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा तसेच जम्मू काश्मीर या चार राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक राज्यातल्या उघड्यावर शौच मुक्त अर्थात ओडीएफ अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
स्वच्छ भारत तसेच सफाईचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्यांनी केलेले कार्य, त्यांचे अनुभव आणि दृष्टीकोन इतरांसमोर मांडावेत याबाबत पंतप्रधानांनी उत्तेजन दिले. हे कार्य पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीपेक्षा अधिक प्रेरणादायी इतर कुठलीही गोष्ट असू शकत नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या योजनांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी निष्ठा पातळीवर पथकांची स्थापना केली पाहिजे, असे ते म्हणाले.
या अभियानाचे जन आंदोलनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. या संदर्भात अधिक जागृती निर्माण करण्यात विद्यार्थी आणि शाळकरी मुले महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असेही पंतप्रधान म्हणाले.