केंद्र सरकारचा पथदर्शी सिंचन कार्यक्रम प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. या बैठकीला विविध संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्री कार्यालय आणि निती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.
एकूण 99 सिंचन प्रकल्पांपैकी 21 प्रकल्प जून 2017 पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पांची एकत्रित सिंचन क्षमता 5.22 लाख हेक्टर इतकी आहे.
त्याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशा या राज्यांमधल्या 45 प्रकल्पांचे काम वेगाने सुरु असून ते नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या सिंचन प्रकल्पांमध्ये ठिबक आणि सूक्ष्म सिंचन प्रकल्पांकडे विशेष लक्ष दयावे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. विविध सरकारी कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन समन्वयातून काम करावे आणि प्रभावी पिक पध्दती आणि जलवापर यंत्रणा तयार कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.
ही योजना राबवतांना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, अवकाश संशोधन उपकरणे यांचा वापर करुन सिंचन प्रकल्पांवर देखरेख ठेवावी असेही पंतप्रधानांनी सांगितले.