पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सध्या या प्रशिक्षणार्थींची पायाभूत अभ्यासक्रमाची 92 वी तुकडी प्रशिक्षण घेत असून त्यात 360 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा ;kr समावेश आहे. पंतप्रधान दोन दिवस तेथे राहणार आहेत.
चार गटांमधून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी अनौपचारिक संवाद साधला. सुमारे चार तास विविध मुद्दयांबाबत चाललेल्या या चर्चेत प्रशिक्षणार्थींनी आपल्या कल्पना आणि विचार मोकळेपणाने आणि निर्भिडपणे मांडावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रशासन, तंत्रज्ञान, धोरण निर्मिती अशा वैविध्यपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा झाली. प्रशासनाशी संबंधित मुद्दयांबाबत प्रशिक्षणार्थींनी अधिक चांग्ल्या प्रकारे आकलनाच्या दृष्टीने सखोल अभ्यास आणि संशोधन करावे असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या प्रशिक्षणार्थींमध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला. या संवादादरम्यान दीर्घकालीन अनुभवाची देवाण-घेवाणही करण्यात आली.
भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणाऱ्या या संस्थेतील अध्यापक सदस्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यांनी पंतप्रधानांना संस्थेच्या एकंदर कामकाजाबाबत माहिती दिली.
पंतप्रधानांनी संस्थेतील गांधी स्मृती वाचनालयाला भेट दिली. तसेच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले.
तत्पूर्वी अकादमीत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळयांना पुष्पांजली अर्पण केली.
मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा आणि संस्थेच्या संचालक उपमा चौधरी यावेळी उपस्थित होत्या.