पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना करून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याला सुरुवात केली.
ओखा आणि बेट द्वारका यांच्यातल्या पुलाच्या आणि रस्ते विकासाच्या इतर प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरणही पंतप्रधानांनी केले. द्वारकामध्ये आज आपल्याला नवा उत्साह आणि ऊर्जा आपल्याला पाहायला मिळाली असे पंतप्रधान म्हणाले. आज ज्या पुलाची पायाभरणी झाली तो पूल म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीशी पुन्हा जोडणारा दुवा आहे.त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून त्यातून रोजगाराला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.विकास म्हणजे पर्यटनाला चालना देणारी गुरुकिल्ली असल्याचे ते म्हणाले.
काही वर्षांपूर्वी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे द्वारकेमधल्या लोकांना समस्यांना कसे तोंड द्यावे लागत होते त्याबाबत पंतप्रधानांनी सांगितले.
गीर कडे अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्यासाठी, द्वारकासारख्या जवळच्या इतर ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन दिले पाहिजे असेही त्यांनी सुचवले. पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे आर्थिक घडामोडीचा विस्तार होईल आणि विकासाला चालना मिळेल. बंदरे आणि बंदर आधारित विकास करण्यासाठी सरकार लक्ष पुरवत असून नील क्रांती अर्थव्यवस्थेतून देशाचा आणखी विकास व्हायला मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले.
मच्छीमारांच्या सबलीकरणासाठी सरकार पाऊले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. बंदर सुधारणेसाठी संसाधनांचा पुरेपूर वापर केल्याने कांडला बंदराचा अभूतपूर्व विकास पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले. अलंग इथे काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत.
सरकार,सागरी सुरक्षा उपकरणे अद्ययावत करत आहे. द्वारका या देवभूमीत यासाठी संस्था उभारण्यात येईल असे पंतप्रधान म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या कालच्या बैठकीत एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की,सरकारवर विश्वास असला आणि धोरणे चांगल्या हेतूने तयार केली असतील तर जनतेने, देशहितासाठी, आम्हाला पाठिंबा देणे स्वाभाविकच आहे.
जनतेच्या आकांक्षा पूर्तीसाठी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकार झटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जगाचे भारताकडे लक्ष लागले असून भारतात गुंतवणूक करण्यासाठी ओघ लागला आहे. भारताच्या विकासात गुजरात सक्रिय योगदान देत असून त्यासाठी आपण गुजरात सरकारचे अभिनंदन करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.