पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन जपानचे पंतप्रधान शिझो अँबे येत्या 13 आणि 14 सप्टेंबर रोजी अधिकृत भारत दौऱ्यावर येत आहे.
गुजरातमध्ये गांधीनगर येथे महात्मा मंदिरात पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अँबे 12व्या भारत-जपान वार्षिक संमेलनात सहभागी होतील. दोन्ही नेते प्रसार माध्यमांशीही संवाद साधतील. त्याच दिवशी भारत-जपान उद्योगविषयक बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अँबे यांच्यातील हे चौथे वार्षिक संमेलन आहे. “विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागिदारी”च्या आराखडया अंतर्गंत भारत आणि जपानच्या बहुपर्यायी सहकार्याच्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेते घेतील आणि त्याची भविष्यातील दिशा निश्चित करतील.
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या कामाची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त आयोजित सार्वजनिक समारंभालाही दोन्ही नेते उपस्थित राहतील. या प्रकल्पामुळे दोन शहरांमधल्या रेल्वे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होणार आहे. अतिजलद रेल्वे जाळयाच्या क्षेत्रात जपान अग्रणी असून तेथील शिनकानसेन बुलेट ट्रेन ही जगातील अतिजलद रेल्वेगाडी आहे.
13 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये विविध सादरीकरणाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवित अहमदाबाद शहर पंतप्रधान अँबे यांचे स्वागत करेल.
साबरमती नदीच्या किनारी महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमालाही दोन्ही पंतप्रधान भेट देतील. त्यानंतर ते अहमदाबादमध्ये 16व्या शतकात बांधलेल्या “सिदी सईद नी जाली” या मशिदीला भेट देतील. महात्मा मंदिर येथे महात्मा गांधीजींना समर्पित “दांडी कुटीर” या वस्तू संग्रहालयालाही दोन्ही नेते भेट देतील.