मालदीव दौऱ्यासाठी निघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल निवेदन खालीप्रमाणे:-
“मालदीवची राजधानी माले येथे जातांना मला विशेष आनंद होत आहे. भारताचे जवळचे शेजारी मित्र राष्ट्र मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष माननीय इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित राहणार आहे.
या निवडणुकांमध्ये त्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचा विजय म्हणजे मालदीवच्या जनतेने लोकशाही, कायद्याचे राज्य आणि समृद्ध भविष्यासाठी निवडलेल्या आयुष्याचे आणि जनतेच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतिकच आहे.
भारत आणि मालदीव दरम्यान अतिशय दृढ नाते असून ऐतिहासिक काळापासून दोन्ही देशातल्या जनतेमध्ये उत्तम संबंध आहेत. शांतता आणि समृद्धीसाठी दोन्हीकडच्या नागरिकांच्या आकांक्षा समान आहेत. सर्वसमावेशक विकासासाठी आमच्या सरकारचा “सबका साथ, सबका विकास” हा दृष्टीकोन आमच्या शेजारी राष्ट्रांसाठीही आहे. मालदीव राष्ट्रातली लोकशाही दृढ व्हावी आणि हे राष्ट्र समृद्ध आणि शांत असावे अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे.
मालदीवच्या विकासाबाबत असलेले प्राधान्य विशेषत: पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, दळणवळण आणि मनुष्यविकास अशा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या मालदीवच्या प्रयत्नात भारत सरकार सोलीह यांच्या सरकारला पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन मी देतो.
माझ्या या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध आणि सहकार्य अधिक दृढ होऊन नवे मैत्री पर्व सुरु होईल असा मला विश्वास आहे”.