महामहीम
आणि माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मिर्जीयोजेव
उझबेकिस्तानहून आलेले सन्माननीय अतिथी आणि मित्रगण,
भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य,
नमस्कार,
राष्ट्राध्यक्षजी,
आपली ही पहिली भारत भेट आहे. आपण आपले कुटुंबीय आणि प्रतिनिधीमंडळा समवेत भारत भेटीवर आला आहात याचा मला आनंद आहे. आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करताना मला अतीव आनंद होत आहे. उझबेकिस्तान आणि भारत यांच्यात साधर्म्य आणि घनिष्ट संबंध असल्याची साक्ष इतिहास आणि संस्कृती देते. मेहमान, दोस्त आणि अज़ीज़ असे अनेक शब्द दोन्ही देशात त्याच समान अर्थाने वापरले जातात. ही केवळ भाषेची समानता नाही. मने आणि भावनांचा हा संगम आहे. आपल्या देशां मधल्या संबंधाचा पाया इतका मजबूत आहे याचा मला अभिमान आहे आणि प्रसन्नताही आहे.राष्ट्राध्यक्षजी आपला आणि माझा परिचय 2015 मधे उझबेकिस्तानच्या माझ्या दौऱ्या दरम्यान झाला. भारता प्रती आपली सद्भावना आणि मित्रता आणि आपल्या व्यक्तित्वाने मला प्रभावित केले. आपली ही चौथी भेट आहे. आपण घनिष्ट मित्र आहोत,उत्कृष्ट मित्र आहोत.आपल्या समवेत एक दृढ प्रतिनिधीमंडळ आहे याचा मला आनंद आहे. आपले आदेश आणि मार्गदर्शनानुसार गेल्या काही दिवसात त्यांच्या उपयुक्त चर्चाही झाल्या आहेत.आज आपल्यातही फलदायी चर्चा झाली.भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करणे आणि आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपला दृष्टीकोन आणि आराखडा आपण परस्परांना विशद केला.आपले प्राचीन मैत्रीपूर्ण संबंध वर्तमान काळातही अधिक समृध्द करण्यासाठी आपण दीर्घ कालीन आढावा घेतला. आपली सुरक्षा,शांतता, समृद्धी तसेच सहकार्य यांच्याशी संबंधित प्रादेशिक मुद्द्यावरही विस्तृत चर्चा झाली.या मुद्द्यांवर आणि शांघाय सहकार्य संस्थेसमवेत आंतरराष्ट्रीय मंचावर आपले सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या देशातले प्राचीन आणि प्रगाढ संबंध, आपल्या जनतेच्या आशा आणि अपेक्षांना अनुरूप विस्तारण्याची वेळ आली आहे यावर आजच्या चर्चेत आमचे एकमत झाले.
महामहीम,
आपल्या धाडसी आणि ठोस उपाययोजना आणि सुधारणांमुळे, उझबेकिस्तान, जुनी व्यवस्था मागे टाकून आधुनिकतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.आपले नेतृत्व आणि दूरदृष्टी याचा हा परिपाक आहे.मी याचे स्वागत करतो.आपले अभिनंदन करतो आणि भविष्यातल्या अधिक सफलतेसाठी शुभेच्छा देतो.
महामहीम,
उझबेकिस्तानच्या प्राधान्यानुसार,त्या प्रयत्नात सहकार्य करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे.नव्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज आम्ही विशेष करून चर्चा केली.व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्यावर आमची सहमती झाली.2020 पर्यंत, द्विपक्षीय व्यापार एक अब्ज डॉलर,करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.पसंती व्यापार करारावर,चर्चा सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.उझबेकिस्तानने दिलेल्या प्रस्तावानंतर, उझबेकिस्तानमधे सामाजिक क्षेत्रात किफायतशीर घरे आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी 200 दशलक्ष डॉलरचा पत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय,800 दशलक्ष डॉलरचा पत पुरवठा आणि एक्झिम बँकेद्वारा, बायर्स क्रेडीट अंतर्गत उझबेकिस्तानच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागतच करू.
अंतराळ,मनुष्य बळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या अनुभवाचा लाभ उझबेकिस्तानने घ्यावा असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे.भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या वाढत्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो.आज आग्रा आणि समरकंद तसेच गुजरात आणि उझबेकिस्तानचे अंदीजन यांच्यात करार झाले. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले दळणवळण वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर आम्ही विचार विमर्श केला. दळणवळण आणि व्यापारासाठी चाबहार बंदर एक महत्वाचा दुवा आहे. अश्काबात कराराचा भारत फेब्रुवारी 2018 मधे सदस्य झाला. यासाठीच्या पाठींब्याबद्दल आम्ही उझबेकिस्तानचे आभारी आहोत. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरीडॉर मधे सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तानने मान्यता दिल्याचा आम्हाला आनंद आहे.
महामहीम,
आपले वरिष्ठ सल्लगार आणि मंत्री उद्या गांधी स्वच्छता संमेलनाच्या समाप्ती समारंभात सहभागी होत आहेत.महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या संदेशाप्रति आपल्या मनात असलेला आदर सर्व भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.ताश्कंदशी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या स्मृती जोडल्या गेल्या आहेत.शास्त्रीजी यांचे स्मारक आणि लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाच्या नूतनीकरणाबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. या दोन महान नेत्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपली भारतातली उपस्थिती आमच्यासाठी विशेष महत्वाची आहे.
महामहीम,
आपले संरक्षण संबंध वृद्धिंगत होत आहेत ही आनंदाची बाब आहे. संयुक्त सैन्याभ्यास आणि सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण यासह संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर आजच्या भेटीदरम्यान चर्चा झाली.राष्ट्राध्यक्षजी, एक सुरक्षित आणि समृद्ध बाह्य वातावरण असावे अशीच भारत आणि उझबेकिस्तानची इच्छा आहे हे आपल्याशी विचार-विमर्श केल्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यासाठी उझबेकिस्तानच्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो. यामध्ये भारत, उझबेकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य करेल. स्थिर, लोकशाही आणि समावेशक आणि समृध्द अफगाणिस्तान, आपल्या संपूर्ण क्षेत्राच्या हिताचा आहे.या संदर्भात आपल्या दोन्ही देशांनी नियमित संपर्क राखण्याचा निर्णय घेतला आहे याचा मला आनंद आहे.सांस्कृतिक आणि उभय देशातल्या जनतेमधले संबंध हे उभय देशातल्या संबंधाचा आधारस्तंभ आहेत.ई व्हिझा, पर्यटन,शैक्षणिक आदान-प्रदान, हवाई मार्ग दळण वळण या विषयांवर आज आम्ही चर्चा केली.
महामहीम,
आज आपण नव्या दिशेने वाटचाल करत आहोत, ज्यामध्ये, आपल्या द्विपक्षीय संबंधाना नवा आयाम मिळेल आणि आपली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे पुन्हा एकदा स्वागत करत भारतातल्या आपल्या सुखद आणि फलदायी प्रवासाची मनोकामना करतो.
अनेक अनेक धन्यवाद !.
आभार.