माननीय राष्ट्रपती डॅनी फॉर, सेशेल्स प्रतिनिधी मंडळाचे सन्माननीय सदस्य
मिडियातले मित्र,
राष्ट्रपती फॉर आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. वर्ष 2015 मधला माझा सेशेल्सचा दौरा, जो हिंदी महासागर क्षेत्रातला माझा पहिला दौरा होता, त्याच्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत. त्याच वेळी तत्कालीन राष्ट्रपती जेम्स मिशेल यांनी भारत दौरा केला होता.
या भेटी आमच्या घनिष्ठ धोरणात्मक भागीदारीसाठी आमची प्रतिबद्धता दर्शवतात. जून 1976 मध्ये सेशेल्स स्वतंत्र झाल्यापासूनच आम्हा दोघा लोकशाही देशांचे विशेष संबंध आहेत. आज भारत आणि सेशेल्स एकमेकांचे प्रमुख धोरणात्मक भागीदार आहेत. दोन्ही देश लोकशाहीच्या मूल्यभूत मूल्यांचे समर्थक आहेत आणि हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठीचा भू- धोरणात्मक दृष्टिकोनही समान आहे.
राष्ट्रपती फॉर आणि माझ्यातली आजची चर्चा खूप फलदायी ठरली. आफ्रिकामध्ये सर्वोच्च मानव विकास निर्देशांक सेशेल्सचा आहे आणि नील अर्थक्रांतीमधला जागतिक स्तरावरचा तो महत्वाचा देश आहे. या यशाबद्दल मी राष्ट्रपती फॉर यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
भारत आणि सेशेल्स हिंदी महासागराशी संबंधित आहेत. आपल्या नागरिकांच्या समृद्धीसाठी सुरक्षित सागरी पर्यावरणात महासागरीय अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास अत्यंत महत्वाचा आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचा यशस्वी सामना करुनच आपण महासागरातील संधीचा लाभ घेऊ शकू. महासागरावर आधारित नील अर्थव्यवस्थेचा पूर्ण लाभ उठवण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याची प्रतिबद्धता आम्ही आमच्या चर्चेत दर्शवली. सागरी आव्हानांचा निपटारा करण्यासाठी सहकार्याबाबत घनिष्ठ धोरणात्मक अभिसरण आहे.
आपल्या ई ई झेडमध्ये तसेच किनारी क्षेत्रांच्या आसपास सामूहिक सागरी सुरक्षा सुनिश्चित करणे ही घनिष्ठ भागीदार म्हणून आमची संयुक्त जबाबदारी आहे. सागरी चाचेगिरी, अमली पदार्थ आणि मानवी तस्करी तसेच सागरी स्रोतांचा बेकायदेशीर उपसा यासारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांपासून आपल्याला धोका आहे. याविरुद्ध आपल्याला सतर्कता आणि सहकार्य वाढवावे लागेल. सेशेल्सला आपली संरक्षण क्षमता आणि सागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तसेच सुरक्षाकर्मींची क्षमता वाढवण्यासाठी सहकार्य करण्याकरिता भारत वचनबद्ध आहे. यामुळे सेशेल्स पारंपारिक आणि अपारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या सागरी आव्हानांशी प्रभावीपणे सामना करु शकेल तसेच आपल्या सागरी संसाधनांचे संरक्षण करु शकेल. यांसदर्भात सेशेल्सच्या संरक्षणासाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कर्ज रुपात देण्याची घोषणा करतांना मला आनंद होत आहे. या कर्जामुळे सेशेल्स आपली सागरी क्षमता निर्माण करण्यासाठी भारताकडून संरक्षण उपकरणे खरेदी करु शकेल. मार्च 2015 मध्ये सेशेल्सच्या दौऱ्यादरम्यान दुसरे डॉर्निअर विमान देण्याचे आश्वासन मी दिले होते. ते विमान उद्या सोपवले जाण्यासाठी सज्ज आहे. त्याचे प्रारुप आत्ताच तुम्ही सर्वांनी पाहिले. ते 29 जूनला सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यासाठी वेळेवर तिथे पोहोचेल.
एजाम्पशन बेट प्रकल्पासंबंधी एकमेकांच्या हिताच्या आधारे मिळून काम करण्यासाठी आमची सहमती झाली आहे. दिशादर्शक तक्त्यांची उपलब्धता सुधारण्यासाठी हायड्रोग्राफी सर्वेक्षणासाठी आम्ही व्यापक सहकार्य करत आहोत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही आज व्हाइट शिपिंग डेटाच्या आदान-प्रदानासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सेशेल्सच्या राष्ट्रीय प्राथमिकता प्रकल्पांसाठी प्रभावी योगदान सुरु ठेवण्यासाठी भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार मी आजच्या चर्चेत केला. या प्रकल्पांमुळे सेशेल्सची अर्थव्यवस्था तर सुधारेलच शिवाय आपले संबंधही अधिक दृढ होतील.
विशेष अनुदानांतर्गत सेशेल्समध्ये तीन नागरी पायाभूत प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी भारत तयार आहे. यात “गव्हर्नमेंट हाऊस” , नवे पोलीस मुख्यालय तसेच महाधिवक्ता कार्यालय यांचा समावेश आहे.
आज आम्ही एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याअंतर्गत सेशेल्समध्ये काही उच्च दर्जाचे, उच्च दृश्यमानतेचे तसेच जनताकेंद्रित लघू विकास प्रकल्प सुरु करण्यासाठी आपल्याकडून वित्तीय साहाय्य दिले जाईल. सेशेल्सच्या सुरक्षाकर्मीसाठी आयटीईसी तसेच अन्य कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन सेशेल्सची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे. सेशेल्सद्वारा निर्धारित क्षेत्रांमध्ये भारतीय विशेषज्ञ सेशेल्समध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले जातील. सेशेल्सच्या अर्थव्यवस्थेत भारतीय समुदायाचे योगदान आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या दोन्ही देशांमध्ये तसेच नागरिकांमध्ये आपली संस्कृती अभिमानाचा विषय आहे आणि आपले संबंध अधिक प्रगाढ करण्याचे दुवे यात आहेत. दोन मोठी अल्दाब्रा कासवे भेट दिल्याबद्दल मी राष्ट्रपती फॉर यांचे आभार मानतो. सेशेल्सकडून अशी दिर्घायुषी कासवे भारताला याआधीही मिळाली आहेत. तीन शतकांचे ते साक्षीदार आहेत. भारतात या प्राण्याप्रती आणि निसर्ग तसेच अनेक जीवजंतू, पशू, झाडांप्रती श्रद्धा आणि प्रेम बाळगले जाते. ही दीर्घायु कासवे यापुढेही आपली चिरंतन मैत्री आणि त्यांच्या शुभ प्रभावांची प्रतिक राहतील. मी पुन्हा एकदा राष्ट्रपती फॉर आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करतो. त्यांचा भारत दौरा आनंददायी ठरो. मी राष्ट्रपती फॉर आणि सेशेल्सच्या जनतेला 29 जून या त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या माझ्याकडून आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने शुभेच्छा देतो.