महामहिम,

राष्ट्रपती सोलिह,

मालदीवहून आलेले इतर मंत्री आणि मान्यवर,

राष्ट्रपती सोलिह, श्रीमती सोलिह आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. मालदीवचे राष्ट्रपती म्हणून पदग्रहण केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अभिनंदन. लोकशाहीसाठी तुम्ही केलेला संघर्ष आणि त्यात तुम्हाला मिळालेले यश केवळ मालदीवसाठीच नाही तर संपूर्ण जगातल्या लोकशाहीसाठी प्रेरणादायी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या तुमच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतासाठी गौरवाची बाब होती. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एक महिन्याच्या आत आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली आहे. ही देखील आमच्यासाठी सन्मान आणि गौरवाची गोष्ट आहे. भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध, परस्पर विश्वास आणि मैत्रीमुळेच तुम्ही भारताची आपल्या परदेश दौऱ्यासाठी निवड केली आहे. केवळ भौगोलिक जवळीकीमुळे आपल्यात मैत्री आहे असे नाही तर सागराच्या लाटांनी आपले किनारे जोडलेले आहेत.

इतिहास, संस्कृती, व्यापार आणि सामाजिक संबंधांमुळे आपण अधिकच जवळ आलो आहोत. दोन्ही देशांमधल्या जनतेमधे लोकशाहीविषयी असलेली आस्था आणि विकासाच्या आकांक्षेमुळे आपल्यात जवळीक निर्माण झाली आहे. तुमच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरु होणार आहे.

मित्रांनो,

राष्ट्रपती सोलीह आणि माझ्यात आज अतिशय सौहार्दाच्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणात यशस्वी चर्चा झाली. दोन्ही देशांमधले पारंपारिक संबंध भविष्यात अधिक दृढ करण्याची कटिबद्धता यावेळी दोघांनीही व्यक्त केली.

महामहिम राष्ट्रपती,

तुमच्या सरकारच्या लोकाभिमुख विकासाच्या दूरदृष्टीचे मला अतिशय कौतुक वाटते. एक मित्र आणि शेजारी देश म्हणून मालदीवच्या यशाची आम्ही प्रार्थना करतो. मालदीवच्या जनतेच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी तुमच्या सरकारने ज्या महत्वाच्या योजना आखल्या आहेत तसेच मालदीवच्या विकासात परिवर्तन घडवण्याच्या तुमच्या प्रयत्नात भारत सदैव तुमच्या सोबत राहील.

आमच्या या कटिबद्धतेची प्रत्यक्ष अभिव्यक्ती म्हणून मालदीवच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी निधीचे पाठबळ, चलनाची अदलाबदल तसेच 1.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज सहाय्य भारत मालदीवला देणार आहे.

दोन्ही देशांमधील दळण-वळण यंत्रणा अधिक उत्तम करण्यासाठी भारत संपूर्ण सहकार्य करेल. या दळण-वळणामुळे वस्तू आणि सेवा, माहिती,विचार आणि संस्कृती तसेच जनतेची देवघेव वाढण्यास मदत होईल. आरोग्य, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, कृषी, क्षमता बांधणी, पर्यटन अशा क्षेत्रातही दोन्ही देशांमधली भागीदारी अधिक सुदृढ बनवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मी सोलीह यांना दिले आहे.

येत्या पाच वर्षात मालदीवच्या नागरिकांना विविध प्रशिक्षणे आणि क्षमता बांधणीसाठी अतिरिक्त एक हजार जागा देण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. दोन्ही देशांमधल्या नागरिकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होणे आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे आणि म्हणूनच आम्ही आज व्हिसा प्रक्रियेबद्दलच्या नव्या कराराचे स्वागत करतो. दोन्ही देशांमधला व्यापार वाढवण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी मालदीवच्या विविध क्षेत्रात भारतीय व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध होण्याचे स्वागत करतो. हे दोन्ही देशांसाठी लाभदायक आहे.

मालदीवमध्ये पारदर्शक, उत्तरदायित्व असलेले आणि नियमांवर आधारित प्रशासन निर्माण होणे भारतीय उद्योजकांसाठी उत्तम गोष्ट आहे. मालदीवमध्ये एचबीसी या श्रेणीमुळे मध्यमवर्गाचा देश बनण्याचा नवा पायंडा पाडण्यात आला याचा आम्हाला अभिमान वाटतो. शाश्वत विकास आणि हवामान बदलाचे गंभीर आव्हान असतानांही मालदीवने या क्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच सागरी संपत्तीचा शाश्वत विकास करण्यात मालदीवची भूमिका जगभरात महत्वाची ठरणार आहे. याच दृष्टीने भारत आणि मालदीव यांच्यात सागरी सहकार्याच्या विविध पैलुंवर परस्पर सहकार्य वाढवण्यास आमची सहमती आहे.

महामहिम राष्ट्रपती,

राष्ट्रकुलात पुन्हा सहभागी होण्याच्या तुमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देऊ. आयोरा म्हणजेच भारतीय महासागर परिसर संघटनेच्या कुटुंबातही तुमचे स्वागत आहे. हिंद महासागरात शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल मी आणि सोलीह यांच्यात एकमत झाले आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षेचे हित एकमेकांशी संबंधित आहे त्यामुळे परस्पर हितासाठी आणि परस्पर चिंतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सहकार्य करण्याविषयी आम्ही सहमती दर्शवली आहे.

यासोबतच, दुसऱ्या देशाला नुकसान होईल अशा कुठल्याही कारवाया आपल्या देशाच्या भूमीवर होऊ द्यायच्या नाहीत अशी ग्वाही आम्ही परस्परांना दिली आहे. भारताच्या विकास आणि स्थैर्यासाठी भारत आणि मालदीव दोघांनाही समान रुची आहे. मालदीव तसेच या परिसराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी राष्ट्रपती सोलीह यांच्यासोबत काम करु इच्छितो. या एकत्रित कामामुळे दोन्ही देशातील नागरिकांच्या आकांक्षा सत्यात उतरण्यास मदत होईल. याचा लाभ नागरिकांसोबतच या क्षेत्राच्या विकासासाठीही होईल असा मला विश्वास आहे.

खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government