आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.
या पुलाच्या उद्घाटनामुळे या भागातल्या जनतेची दीर्घकालीन प्रतिक्षा समाप्त झाली आहे, असे पंतप्रधानांनी धौला येथे जाहीर सभेत बोलतांना सांगितले.
विकासासाठी, पायाभूत सोयीसुविधा सर्वात महत्वाच्या आहेत आणि जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यामधले दळणवळण वाढणार असून आर्थिक विकासाची दारेही मोठ्या प्रमाणात खुली होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाचा पूर्व आणि ईशान्य भागात आर्थिक विकासाची मोठी क्षमता आहे, असे सांगून यासंदर्भात हा पूल केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाचा केवळ एक भाग आहे.
या पुलामुळे जनतेच्या जीवनात सकारामक बदल घडेल. केंद्र सरकार, जलमार्गच्या विकासावर मोठा भर देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
देशाच्या ईशान्य भागातचे इतर भागांशी दळणवळण वाढवण्याला केंद्र सरकारचे प्राध्यान्य असून यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे. ईशान्य भागाशी उत्तम दळणवळण सुविधांमुळे दक्षिण-पूर्व आशियाच्या अर्थव्यवस्थेशीही हा भाग जोडला जाईल.
ईशान्येकडच्या भागात पर्यटनाच्या अमाप संधी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. धोला-सदिया पुलाला महान संगीतकार, गीतकार, कवी भूपेन हजारिका यांचे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचंही पंतप्रधान म्हणाले.