चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली 23-24 जून 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या वतीने सहभाग नोंदवला. ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा हे देखील (23 जून) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. 24 जून रोजी बिगर -ब्रिक्स सहभाग अंतर्गत जागतिक विकासावर उच्चस्तरीय संवाद आयोजित करण्यात आला होता.
23 जून रोजी, नेत्यांनी दहशतवादाचा बीमोड , व्यापार, आरोग्य, पारंपारिक औषध शास्त्र , पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष , कृषी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रांसह बहुपक्षीय व्यवस्थेतील सुधारणा, कोविड-19 महामारी, जागतिक आर्थिक उभारी यासारख्या जागतिक संदर्भातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी ब्रिक्स ओळख मजबूत करण्यासाठी आणि ब्रिक्स दस्तावेजसाठी ऑनलाइन डेटाबेस स्थापन करणे , ब्रिक्स रेल्वे संशोधन नेटवर्क आणि एमएसएमई दरम्यान सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन केले. .ब्रिक्स देशांमधील स्टार्टअप्समधील संबंध मजबूत करण्यासाठी भारत यावर्षी ब्रिक्स स्टार्टअप कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ब्रिक्स सदस्य या नात्याने आपण एकमेकांच्या सुरक्षेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि दहशतवाद्यांविरोधात परस्पर सहकार्य केले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले; या संवेदनशील मुद्द्याचे राजकारण केले जाऊ नये. शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी, ब्रिक्स नेत्यांनी ‘बीजिंग घोषणापत्र’ स्वीकारले.
24 जून रोजी पंतप्रधानांनी आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि पॅसिफिक ते कॅरिबियन पर्यंत भारताची विकास भागीदारी अधोरेखित केली. मुक्त, खुल्या , सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित सागरी क्षेत्रावर भारताचा भर , हिंद महासागर क्षेत्रापासून पॅसिफिक महासागरापर्यंत सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेप्रति आदर; आणि आशियाचा मोठा भाग, संपूर्ण आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला जागतिक निर्णय प्रक्रियेत स्थान नाही म्हणून बहुपक्षीय व्यवस्थेतील सुधारणा यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी चक्रीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व नमूद केले आणि सहभागी देशांतील नागरिकांना लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट (LIFE) मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. अल्जेरिया, अर्जेंटिना, कंबोडिया, इजिप्त, इथिओपिया, फिजी, इंडोनेशिया, इराण, कझाकस्तान, सेनेगल, उझबेकिस्तान, मलेशिया आणि थायलंड हे सहभागी अतिथी देश होते.
तत्पूर्वी, 22 जून रोजी ब्रिक्स व्यापार मंचाच्या उद्घाटन समारंभात केलेल्या बीजभाषणात पंतप्रधानांनी ब्रिक्स व्यापार परिषद आणि ब्रिक्स महिला उद्योग आघाडीचे कौतुक केले , ज्यांनी कोविड-19 महामारी असूनही त्यांचे कार्य सुरू ठेवले. सामाजिक आणि आर्थिक आव्हाने, स्टार्टअप्स आणि एमएसएमईसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपायांच्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी ब्रिक्स उद्योग समुदायाला केली