पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या समपदस्थ, जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. अँजेला मर्केल यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
युरोपियन व जागतिक टप्प्यावर स्थिर आणि भक्कम नेतृत्व देण्यासंदर्भात चॅन्सेलर मर्केल यांच्या प्रदीर्घ भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि भारत-जर्मनी सामरिक भागीदारी वाढण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कोविड-19 महामारी, द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक समस्या विशेषत: भारत-युरोपियन युनियन संबंध इत्यादी महत्वाच्या मुद्द्यांवर उभय नेत्यांनी यावेळी चर्चा केली.
पंतप्रधानांनी लसी विकासासंदर्भात भारतातील घडामोडींविषयी मर्केल यांना माहिती दिली आणि जगाच्या फायद्यासाठी स्वतःची क्षमता तैनात ठेवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेविषयी चॅन्सेलर मर्केल यांना आश्वस्त केले. जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमधील संक्रमणाच्या नव्या लाटेच्या लवकर नियंत्रणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) मध्ये सामील होण्याच्या जर्मनीच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि आपत्ती निवारण पायाभूत सुविधा (सीडीआरआय) व्यासपीठाअंतर्गत जर्मनीशी सहकार्य आणखी मजबूत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावर्षी भारत आणि जर्मनी यांच्यात द्विपक्षीय संबंध स्थापनेचा 70 वा वर्धापन दिन आणि रणनीतिक भागीदारीचा 20 वा वर्धापन दिन लक्षात घेता, दोन्ही नेत्यांनी 2021 मध्ये लवकरच सहावी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) आयोजित करण्यास आणि त्यासाठी एक महत्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यास सहमती दर्शविली.