पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या उपाध्यक्ष, महामहिम कमला हॅरिस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
अमेरिकेच्या '' जागतिक लस सामायिकीकरण धोरण'' अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लस भारतासह इतर देशांना उपलब्ध करुन देण्याची अमेरिकेची योजना आहे, अशी माहिती उपाध्यक्ष हॅरिस यांनी पंतप्रधानांना दिली.
अमेरिकेच्या निर्णयाबद्दल तसेच अमेरिकी सरकार, व्यापारउदीम आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीय समुदायाकडून अलिकडच्या काळात भारताला मिळालेले अन्य सर्व प्रकारचे पाठबळ आणि एकजुटीच्या भावनेसाठी पंतप्रधानांनी उपाध्यक्ष हॅरिस यांच्याकडे प्रशंसा केली.
अमेरिका आणि भारत या देशांदरम्यान लस उत्पादनाच्या क्षेत्रासह आरोग्य पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर उभय नेत्यांनी चर्चा केली. महामारीच्या आरोग्यावरील दीर्घकालीन परिणामांकडे लक्ष वेधत भारत-अमेरिका भागीदारीसह क्वाड लस उपक्रमाची संभाव्यता त्यांनी अधोरेखित केली.
जागतिक स्तरावर आरोग्य परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लवकरच उपाध्यक्ष हॅरिस यांचे भारतात स्वागत करण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.