पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष माटेमाला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 मुळे सातत्याने निर्माण होत असलेली आव्हाने आणि दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली लसीकरण मोहीम याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
भारताच्या औषधांच्या आणि लसींच्या निर्मितीच्या व्यापक क्षमतेचा पुरेपूर फायदा आफ्रिकेसह सर्व देशांना करून देण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांना दिली. लसी आणि औषधांची उपलब्धता आणि त्यांचा किफायतशीरपणा यांचा फायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर करून देण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सहकार्याच्या शक्यतेबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या महामारीविरोधात केलेल्या उपाययोजनांचे अनुभव आणि त्याविरोधात परस्पर सहकार्याने होणारे संभाव्य प्रयत्न यासाठी आगामी काळात दोन्ही देशांचे अधिकारी परस्परांच्या संपर्कात सातत्याने राहतील याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.