पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
ओलाफ शोल्झ यांच्या चान्सेलर पदावरील नियुक्तीबद्दल, पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, भारत-जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात, आधीच्या चान्सेलर एंजेला मर्केल यांनी दिलेल्या मोठ्या योगदानाविषयी त्यांनी यावेळी कृतज्ञ भावना व्यक्त केली.
जर्मनीच्या नव्या सरकारने जाहीर केलेली नवी प्रशासकीय धोरणे आणि त्यांचा प्राधान्यक्रम तसेच भारताचा आर्थिक दृष्टिकोन यात लक्षणीय साम्य आणि समन्वय असल्याबद्दल, या संभाषणात दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेले सहकार्यविषयक उपक्रम,ज्यात, गुंतवणूक आणि व्यापार वाढवणे यांचाही समावेश असून, या सर्व उपक्रमांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये, अधिक विस्तृत सहकारी आणि देवघेवीला वाव आहे, यावरही उभय नेत्यांनी सहमती व्यक्त केली. विशेषत: हवामान बदल आणि हरित ऊर्जा अशा क्षेत्रात सहकार्याने नवे उपक्रम सुरु करता येतील, जेणेकरुन, दोन्ही देशांना त्यांच्या हवामान विषयक वचनबद्धता पूर्ण करता येतील, अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, चान्सलर शोल्झ आणि जर्मनीच्या नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, द्विपक्षीय आंतर-सरकारी चर्चासत्रासाठी शोल्झ यांची प्रत्यक्ष भेट घेण्यास आपण उत्सुक असल्याचे, पंतप्रधान म्हणाले.