पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी उभय नेत्यांनी 2019 मध्ये स्थापन झालेल्या द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि भारत-सौदी भागीदारीमध्ये झालेल्या स्थिर विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकीचा आणखी विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली तसेच भारतीय अर्थव्यवस्थेद्वारे सौदी गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या संधींवर प्रकाशझोत टाकला.
भारत आणि सौदी अरेबियामधील विशेष मैत्री आणि दोन्ही देशांमधील लोकांमध्ये असलेला संपर्क पाहता कोविड-19 साथीच्या आजाराविरूद्ध एकमेकांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे यावेळी उभय नेत्यांनी मान्य केले. परस्पर हितसंबंधासाठी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांनी आढावा घेतला.
पंतप्रधानांनी युवराजांना लवकरात लवकर भारत भेटीसाठी येण्याचे पुन्हा आमंत्रण दिले.