पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अबू धाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान आणि संयुक्त अरब अमिरातच्या सशस्त्र दलाचे ‘डेप्युटी सुप्रिम कमांडर’ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी आपापल्या देशांत कोविड महामारीमुळे झालेल्या परिणामांविषयी चर्चा केली आणि अशा आरोग्यविषयक आपत्तीमध्येही भारत आणि यूएईमध्ये असलेल्या सहकार्याच्या भावना कायम राहिली, याविषयी समाधान व्यक्त केले.
कोविडनंतरच्या जगामध्ये भारत आणि यूएई यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सल्लामसलत आणि सहकार्य सुरू ठेवण्याविषयी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. तसेच व्यापार आणि गुंतवणुकीतील संधींच्या संदर्भात नाविन्य, वैविध्य निर्माण करण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
यूएईमधील भारतीय समाजाच्या हितासाठी महामहीम वैयक्तिकरित्या लक्ष देत असून त्यांची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
कोविड संकटावर लवकरच मात करता येईल, असा विश्वास दोन्ही देशांच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला आणि नजीकच्या काळात व्यक्तिश: भेट होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.