युवा मित्रहो,
आज एकाच वेळी अनेक प्रकल्पांच्या शुभारंभासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली.उत्तर प्रदेश सरकार ज्या जोमाने आणि उत्साहाने काम करत आहे,सुस्पष्ट दृष्टिकोन ठेवून विकासाची वाटचाल करत आहे,त्याकडे, उत्तर प्रदेशातल्या क्षणोक्षणी घडणाऱ्या घटनांकडे, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचे, लक्ष आहे, मोठी उत्सुकता आहे.योगीजी यांच्या नेतृत्वाखाली एकापाठोपाठ एक पाऊले उचलली जात आहेत,प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे, अनेक वर्षाचे जुनाट दुखणे आणि अनेक वर्षांचे अडथळे दूर करत उत्तर प्रदेशला वेगाने पुढे नेण्याच्या प्रयत्नांसाठी, योगीजीं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.
आज मला औषध संशोधन संस्थेमध्ये काही काळ व्यतीत करता आला.आपले वैज्ञानिक मानवजातीसाठी, प्रभावी आणि परवडणाऱ्या त्याचबरोबर त्याचे इतर दुष्परिणाम न करणाऱ्या औषधांच्या संशोधनासाठी आपले आयुष्य व्यतीत करतात. वैज्ञनिक एकप्रकारे आधुनिक ऋषीच असतात. मानवजातीला समस्यांपासून मुक्ती कशी देता येईल, व्याधींपासून सुटका कशी करता येईल, परंपरागत ज्ञान आणि विज्ञानाच्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून, आधुनिक व्यवस्थेच्या माध्यमातून अधिक अचूक कसे करता येईल यासाठी ते समर्पित भावनेने काम करत आहेत.
आज मानव जातीपुढे, विशेषकरून, आरोग्य क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत.एखादे औषध तयार करण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात, शेकडो वैज्ञानिक त्यासाठी आयुष्य वेचतात, मात्र त्यापूर्वीच एखादा नवा रोग समोर ठाकतो. विज्ञानाच्या मदतीने, कल्पकतेने, आपल्याला, या आजारांवर मात करायची आहे. गरिबातल्या गरीब व्यक्तीला स्वस्त आणि अचूक औषध कसे उपलब्ध होईल,या आव्हानाचा स्वीकार करून त्यात यशस्वीही व्हायचे आहे.
आज मला या तंत्र विद्यापीठाच्या इमारतीचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव या विद्यापीठाशी जोडलेले आहे.तंत्रज्ञानाशी निगडित जगाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यापेक्षा मोठी प्रेरणा असूच शकत नाही.विज्ञान वैश्विक आहे मात्र तंत्रज्ञान हे स्थानिकच असले पाहिजे. आणि इथेच आपली परीक्षा आहे.विज्ञानाचे सिद्धांत मांडले गेले आहेत.विज्ञानाचे ज्ञान उपलब्ध आहे, उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून,तंत्रज्ञान मानवी जीवनावर प्रभाव टाकत आहे, तेव्हा सामान्य मानवी जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने, आपल्या युवा पिढीने या तंत्रज्ञानात असे संशोधन करावे आणि असे आविष्कार घडवावे अशी अपेक्षा आहे. भारत असा देश आहे, ज्याच्याकडे आठशे दशलक्ष युवकांची शक्ती आहे, 35 पेक्षा कमी वय असलेल्या युवकांचा हा देश आहे, त्याच्याकडे बुद्धीचे सामर्थ्य आहे.
हाती कौशल्य असेल, विज्ञानाचे अधिष्ठान असेल आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असेल तर माझ्या देशातल्या युवकांकडे जगभरात नावलौकिक मिळवण्याचे सामर्थ्य आहे. मागच्या शतकात उपयुक्त ठरलेल्या आणि त्या वेळी बहुमोल कार्य केलेल्या मात्र येणाऱ्या शतकात कदाचित उपयुक्त न ठरणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण प्रगती करू शकत नाही.म्हणूनच तंत्रज्ञानाला काळाच्या पुढे राहावे लागते, दूरवर पाहावे लागते. भारताच्या युवकांकडे ते सामर्थ्य आहे.या सामर्थ्याच्या बळावर आपण तंत्रज्ञानात नवी शिखरे कशी गाठता येतील हे पाहायला हवे.
आजही आपला देश, संरक्षण क्षेत्रासाठी, आपल्या सैन्यासाठी लहान-मोठ्या गोष्टी परदेशातून आयात करतो. संरक्षण क्षेत्रात आपण लवकरच आपल्या देशाला स्वयंपूर्ण करू शकत नाही का? देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्या संसाधनांची आवश्यकता आहे, ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे, ज्या उपकरणांची आवश्यकता आहे, ते सर्व आपण नव -नव्या संशोधनाच्या साहाय्याने करू शकत नाही का ? संरक्षण क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण कसा बनेल हे स्वप्न बाळगून आम्ही वाटचाल करत आहोत. त्यासाठी आम्ही धोरणात्मक बदल केले.
संरक्षण क्षेत्रात 100 % विदेशी गुंतवणूक आम्ही खुली केली. भारत सरकार ज्या गोष्टी बाहेरून घेते, त्या गोष्टी आपल्या देशात बनवलेल्या घेतल्या तर त्याला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी सूची तयार केली आहे.या साऱ्या संधी, तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या आपल्या युवा पिढीसाठी आहेत.
असेच आणखी एक क्षेत्र आहे. आज वैद्यक क्षेत्रावर एका प्रकारे तंत्रज्ञानाचे वर्चस्व आहे.आता डॉक्टर नाही ठरवत की, आपल्याला कोणता आजार आहे तर मशीन अर्थात यंत्र ठरवते कीआपल्याला कोणता आजार आहे. आपल्याला काय दुखणे आहे, शरीरात कशाची कमतरता आहे, कसला त्रास आहे, हे सर्व यंत्र ठरवते. त्यानंतर डॉक्टर त्या अहवालाच्या आधारे, औषधें कोणती असावीत, ऑपरेशन करावे लागणार की नाही याचा निर्णय घेतात. ही वैद्यकीय उपकरणे, त्यांची निर्मिती, भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात याची केवढी मोठी गरज आहे. तंत्र क्षेत्रातले आपले विद्यार्थी, यासंदर्भात स्टार्ट - अप करण्याबाबत विचार करू शकतात, आरोग्य क्षेत्रात ज्या उपकरणांची आवश्यकता आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या देशातच, नव -नव्या शोधांच्या साहाय्याने, या उपकरणांच्या निर्मितीच्या दिशेने वाटचाल करू या.
मेक इन इंडिया ही संपूर्ण संकल्पना, तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या हिंदुस्तानच्या आपल्या युवकांना नवी संधी देण्यासाठी आहे.स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, स्किल इंडिया, मुद्रा योजना, तंत्रविषयक आधार असो, मनुष्यबळ विकासात कौशल्याला प्राधान्य द्यायचे असो, तंत्रविषयक ज्ञानात नवी शिखरे गाठायची असोत,एक सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगत, देशाकडे, विद्यापीठांकडे, जे तंत्रविषयक ज्ञान आहे, आपल्या युवा पिढीकडे आहे, या सर्वात संतुलन करून, संकलन करून, देशाला नव्या शिखरावर न्यायचे आहे. हिंदुस्तानच्या युवकांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी आव्हाने पार केली आहेत हे आपल्या देशाने सिद्ध केले आहे.
मंगळावर जाण्यासाठी जगातल्या मोठ्या -मोठ्या देशांनी प्रयत्न केले. जगातला कोणताच देश, पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आणि त्याच्या कक्षेत जाऊ शकला नाही.हिंदुस्थान हा जगातला पहिला देश आहे जो पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आणि कक्षेत पोहोचला. संपूर्ण जगाला आश्यर्य वाटले की, भारताच्या युवा वैज्ञानिकांनी अतिशय कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी केली. आपल्याला लखनौमध्ये टॅक्सिने प्रवास करायचा असेल, रिक्षेने जायचे असेल तर एका किलोमीटरला 10 रुपये लागतच असतील.आपण मंगळावर पोहोचलो ते एका किलोमीटरला फक्त सात रुपये खर्चात.मंगळ मोहिमेचा जो खर्च होता, तो हॉलीवूडच्या चित्रपटापेक्षा कमी होता, या कमी खर्चात आपल्या देशातले वैज्ञानिक मंगळावर पोहोचले.
हे सामर्थ्य आहे आपल्या युवा पिढीमध्ये, आपल्या देशाच्या प्रतिभावान युवकांमध्ये, तंत्रज्ञांमध्ये आणि वैज्ञानिकांमध्ये. काही दिवसांपूर्वी भारताने एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडले. हे जगासाठी आश्यर्य होते की एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता या देशाच्या वैज्ञानिकांमध्ये आहे. ही ताकत, हे सामर्थ्य घेऊन पुढे प्रवास करायचा आहे.याच अर्थाने आज हे तंत्र विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न सर्व महाविद्यालयांना पुढे कसे नेता येईल याचा विचार व्हायला हवा.उत्तर प्रदेशात शिक्षण क्षेत्रात काम करणे किती कठीण आहे हे मी जाणतो. राज्यपाल,राम नाईकजी, कुलपती या नात्याने,विद्यापीठात शिस्त कशी येईल,विद्यापीठात नियोजित वेळेत काम कसे पूर्ण होईल, याबाबत अहोरात्र काम करत होते.
उत्तर प्रदेशात 28 विद्यापीठांपैकी 24 विद्यापीठात, वेळेवर परीक्षा आणि पदवीदान समारंभ घेण्यात त्यांना यश मिळाले आहे. ही शिस्त खूप आवश्यक आहे. राम नाईकजी, हातात घेतलेली गोष्ट पूर्ण करतात.त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातल्या विद्यापीठात नियमावलीचे पालन करत, शिस्त कायम राखत, विद्यार्थ्यांच्या वेळेचे नुकसान होऊ नये यावर कटाक्ष ठेवत पुढे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत.योगीजी यांचे सरकार आल्याने आणखी सुविधा प्राप्त झाल्या आहेत.काम आणखी सुलभपणे पुढे नेत आहेत.
माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, काही कुटुंबाना, त्यासंदर्भातल्या परवानगीबाबत एक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. भारत, 2022 मधे, स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्यानी, स्वातंत्र्यासाठी फाशी स्वीकारली, आयुष्य खर्ची घातले. त्यांना सुखी, समृद्ध हिंदुस्थान पाहायचा होता, स्वतंत्र भारत पाहायचा होता. यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. 2022 मधे स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानला यशाच्या शिखरावर नेणे, ही सव्वाशे कोटी देशवासीयांची जबाबदारी नाही का? सव्वाशे कोटी देशवासियांमध्ये, हिंदुस्थानला नव्या शिखरावर नेण्याचे सामर्थ्य आहे असा मला विश्वास आहे. 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीला, हिंदुस्तानमधल्या गरिबातल्या गरिबाकडे त्याचे स्वतःचे घर असावे, त्यात शौचालय, वीज, पाणी, मुलांना शिकण्यासाठी जवळच शाळा असावी असे आमचे स्वप्न आहे.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशात ग्रामीण आवास, शहरी आवास हे अभियान चालवण्यात येत आहे त्या अंतर्गत, काही मातांना घर मिळावे यासाठी सरकारकडून एक संमतीपत्र देण्यात आले. एक माता म्हणत होती की आता चांगले झाले, आता माझे घर तयार होईल, मुलांचे लग्न करेन आणि तुम्हाला लग्नाला बोलावेन. इतका उत्साह होता.स्वप्ने सत्यात उतरू लागली की माणूस कोणत्याही परिस्थितीत असला तरी काहीतरी करण्याची उर्मी त्याला येते, हे मी त्या मातेच्या शब्दातून जाणले. शब्द त्या मातेचे होते मात्र त्यातला भाव मोठी प्रेरणा देतो.
आज विकासासाठी विदयुत ऊर्जा महत्वाची आहे. तंत्रज्ञानावर आधारित या जीवनात ऊर्जेचे आपले स्वतःचे सामर्थ्य आहे. नवीकरणीय ऊर्जा, सौर ऊर्जेच्या माध्यमातून देशात नवी क्रांती आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. एलईडी ब्लब घरो -घरी पोहोचवण्याचे मोठे अभियान सुरु आहे. सुमारे 22 कोटी हुन अधिक एलईडी ब्लब एका वर्षाच्या आत घराघरांमधून लागले आहेत,त्याद्वारे जास्त वीज आणि तीही कमी खर्चात उपलब्ध होत आहे.ज्या कुटुंबात एलईडी ब्लबचा वापर होत आहे त्यामुळे जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपयांची बचत होत आहे. सर्वसामान्यांच्या पैशाची बचत होत आहे. आज 400 के.व्ही. पारेषण वाहिनीचे मी लोकार्पण करत आहे. कानपूरपर्यंत हा जो मध्य भाग आहे, उन्नावसह हा सगळा भाग आहे, तिथे उत्तम वीज मिळेल आणि इथल्या औद्योगिक जीवनाला मदत होईल. मी तर ऐकले आहे की इथे वीज वितरणातही अति महत्वाच्या व्यक्तींसाठी कोटा होता, काही जिल्ह्यात अशा व्यक्ती राहत होत्या त्यांच्यासाठी वेगळी वीज आणि इतरांसाठी वेगळी वीज. सर्व 75 जिल्ह्यात वीज कारभारात एकसमान मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी योगीजींचे अभिनंदन करतो. शासनाचे हेच काम असते. काहींना विशेष लाभ आणि इतरांना काहीच नाही, अशी व्यवस्था मोडीत काढण्यासाठी किती अडचणी येतात हे मी जाणतो, मात्र योगीजीं हे नक्कीच करतील असा मला विश्वास आहे.
बंधू-भगिनींनो, विकासाचे नवे शिखर पार करण्याचा देश प्रयत्न करत आहे.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे शिखर गाठायचे आहे.सव्वाशे कोटी लोकसंख्येचा हा देश,या सव्वाशे कोटी देशवासीयांची ताकत.आज जगभरातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये,सर्वात वेगाने वाटचाल करणारा कोणता देश असेल तर त्या देशाचे नाव हिंदुस्थान आहे हे संपूर्ण जगाचे म्हणणे आहे. अवघे जग आज भारताकडे गौरवाने पाहत आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांनी निश्चय करावा, उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी निश्चय करावा, बदल कसा घडतो ते पहा.
1जुलै पासून वस्तू आणि सेवा कराचा प्रारंभ होत आहे. देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. देशातले सर्व राजकीय पक्ष,सर्व राजकीय नेते आणि देशातली सर्व राज्य सरकारे, केंद्र सरकार एकत्र येऊन ऐतिहासिक काम करत आहेत, ज्यामुळे 1 जुलैपासून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडणार आहे. ही मोठी कामगिरी आहे. भारताच्या संघीय रचनेचे द्योतक आहे. भारताच्या राजकीय पक्षांची परिपक्वता सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षांपेक्षा देश महत्वाचा हे हिंदुस्तानच्या सर्व राजकीय पक्षांनी दर्शवले आहे.सर्व राजकीय पक्षांचा मी आभारी आहे, सर्व राज्य सरकारांचा आभारी आहे, सर्व विधानसभांचा आभारी आहे, लोकसभा, राज्यसभेचा आभारी आहे.सर्वानी एकत्र येऊन वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मला विश्वास आहे की 1 जुलै नंतर नागरिकांच्या सहकार्याने विशेषतः छोटया-मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आपण वस्तू आणि सेवा कराबाबत यशस्वीपणे वाटचाल करू तेव्हा जगासाठी मोठे आश्यर्य असेल की एवढा मोठा देश अशा प्रकारे परिवर्तन घडवू शकतो.
भारताच्या लोकशाहीच्या सामर्थ्याची प्रचिती जगाला येईल. या देशातले सर्व राजकीय पक्ष,सर्व भिन्न-भिन्न विचारधारा असलेले पक्ष, खांद्याला खांदा भिडवून एवढा मोठा निर्णय घेतात हे जगासाठी एक प्रकारे आश्चर्यच आहे.भारताच्या लोकशाहीची ही ताकत आहे. भारताच्या लोकशाहीच्या प्रगल्भतेची ताकत आहे.भारताच्या लोकशाहीतल्या राजकीय पक्ष नेतृत्वाच्या प्रगल्भतेच्या ताकदीमुळे हे शक्य झाले आहे.म्हणूनच याचे श्रेय मोदींना जात नाही आणि कोणत्या एका सरकारकडे याचे श्रेय जात नाही.याचे श्रेय जाते ते सव्वाशे कोटी देशवासियांकडे. भारताच्या प्रगल्भ लोकशाहीला , देशाच्या सर्व राजकीय पक्षांना, देशाच्या सर्व विधानसभांना, लोकसभेला आणि राज्यसभेला याचे श्रेय जाते.
एवढे मोठे काम झाले आहे.ते जाणून घेऊ,अडचणी असतील तिथे सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. या अडचणी दूर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु राहतील.एक सफल प्रवास अधिक सुफल ठरावा यासाठी 1जुलै पासून देशातल्या सर्वानी,विशेषकरून व्यापाऱ्यांनी,याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी, पुढे येऊन सुलभपणे हे काम पार पाडण्यासाठी ,व्यापारी वर्गाने देशाचे नेतृत्व करावे आणि हा वर्ग हे काम निश्चितच करेल असा मला विश्वास आहे.
ही अपेक्षा बाळगून मी आपणा सर्वाना, या परिसरात शिक्षण घेणाऱ्या, या परिसराशी जोडल्या गेलेल्या सर्व युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि सफलतेची आकांक्षा बाळगतो.
धन्यवाद.