पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आज जी 7 शिखर परिषदेच्या पहिल्या आऊटरीच म्हणजेच जनसंपर्क सत्रामध्ये सहभागी झाले.
‘बिल्डिंग बॅक स्ट्रॉन्जर - हेल्थ’ हे शीर्षक असलेले हे सत्र कोरोना विषाणू महामारीपासून जागतिक मुक्तता आणि भविष्यातील महामारीविरोधात भविष्य बळकट करणे यावर केंद्रित होते
अलिकडच्या कोविड संसर्गाच्या लाटेत जी-7 आणि इतर अतिथी देशांनी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल या सत्रात पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
महामारी विरोधातील लढ्यात सरकार, उद्योग आणि नागरी समाजातील सर्व स्तरांच्या प्रयत्नांच्या सहकार्यासह 'संपूर्ण समाज' हा दृष्टिकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला.
रुग्णांचे संपर्क शोध आणि लस व्यवस्थापनासाठी मुक्त स्रोत डिजिटल उपकरणांचा भारताने केलेला यशस्वी वापर त्यांनी यावेळी समजावून सांगितला आणि इतर विकसनशील देशांना आपला अनुभव आणि कौशल्य सांगण्यासाठीची भारताची इच्छा व्यक्त केली.
जागतिक आरोग्य शासन सुधारण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांना पाठिंबा देत पंतप्रधानांनी यासाठी भारताची वचनबद्धत्ता दर्शवली आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेत प्रस्तावित केलेल्या कोविडशी संबंधित तंत्रज्ञानावरील ट्रिप अर्थात बौद्धिक संपत्ती हक्कांच्या व्यापाराशी संबंधित पैलूंवरील कराराच्या सवलतीसाठी त्यांनी जी -7 देशांचे समर्थन मागितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या बैठकीतून संपूर्ण जगासाठी “एक पृथ्वी , एक आरोग्य ” हा संदेश प्रसारित झाला पाहिजे. भविष्यातील महामारी रोखण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि एकात्मता निर्माण करण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी या संबंधित लोकशाहीवादी आणि पारदर्शक संस्थांच्या विशेष उत्तरदायित्वावर जोर दिला.
पंतप्रधान उद्या जी 7 शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी भाग घेतील आणि दोन सत्रात भाषण करतील.